वैभव नाईक; आंबडोस पावनवाडी रस्ता कामाचा शुभारंभ…
मालवण,ता.१०: शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षातील कार्यकर्ते वाढू नयेत यासाठीच विरोधकांकडून पक्षाला संपविण्याचा डाव आहे. मात्र माझ्या, तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी कितीही संकटे आली तरी न डगमगता हा पक्ष जिवंत ठेऊन विरोधकांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम केले आहे. यापुढेही राज्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पक्षाची सत्ता राज्यात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी आज आंबडोस येथे केले.
आंबडोस पावनवाडी येथे बजेट योजनेंतर्गत रस्ता कामास ३० लाख रुपये मंजूर झाले असून या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, सरपंच सुबोधिनी परब, शाखाप्रमुख विशाल धुरी, दिलीप परब, दिलीप नके, दिपलक्ष्मी परब, कल्पना नाईक, ओमप्रकाश चव्हाण, अजिंक्य परब, अमित राणे, विनोद धुरी, विनायक सावंत, नीलम नाईक, सुधा सावंत, कल्पना राणे, गीतांजली धुरी, प्रतिज्ञा नाईक यांच्यासह शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले, आंबडोस पावनवाडी रस्त्याच्या कामास २०२२ मध्ये मंजुरी मिळाली होती. मात्र मधल्या काळात सत्तेवर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी यासह असंख्य कामांना स्थगिती दिली. या विरोधात न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने ही बंदी उठविली. त्यानुसार सद्यस्थितीत या कामांना सुरवात झाली आहे. मोठ्या रस्तासह गावातील छोट्या रस्त्यांची कामेही मार्गी लागायला हवीत यासाठी आपले तसेच खासदार विनायक राऊत यांचे नेहमीच प्रयत्न राहिले आहेत. गावातील सभामंडपाचे कामही येत्या काळात मार्गी लावले जाईल यासह अन्य विकासात्मक कामेही मार्गी लावली जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी हरी खोबरेकर यांनीही आपले विचार मांडले. सरपंच सुबोधिनी परब यांनी या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार नाईक यांचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले.



