शिक्षणमंत्री केसरकर यांच्या हस्ते पुस्तक दालनाचे उद्घाटन…
देवगड,ता.१०: तालुक्यातील पोंभुर्ले-मालपे येथील विस्तार प्रकल्पाच्या योजने अंतर्गत ॲग्रो टुरिझम यांच्या ग्रंथ दालनात पुस्तकांच्या गावाच्या पहिल्या दालनाचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
पर्यटना बरोबर पोंभुर्ले-मालपे गावांचा विकास व्हावा, वाचन चळवळीला व्यापक स्वरूप देण्यात यावे, येथील लोकांचे जीवनमान उंचावावे, पुस्तकांचे गाव या योजनेतील लोकप्रियता लक्षात घेऊन मराठी भाषेचा विकास प्रचार आणि संस्कृतीची जोपासना व्हावी, भाषेची आवड वाढवावी, भारतातील दुसरे आणि कोकणातील हे पहिले ग्रंथदालन आहे. असे प्रतिपादन केसरकर यांनी केले.
यावेळी व्यासपिठावर माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद मालपेकर, संचालक राज्य मराठी विकास संख्याचे डॉ. शामकांत देवरे, पुस्तक निवड समितीचे रेखा दिघे, देवगड तहसिलदार श्रीकृष्ण ठाकूर, देवगड सर्कल जनार्दन साहीले, उमेश तोरस्कर, देवगड पत्रकार समितीचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, पर्यटन एके पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हयाचा विकास साधला जात आहे. या जिल्हयामध्ये गेल्या काही वर्षाचा इतिहास पाहता पर्यटक येण्याची संख्या झपाटयाने वाढत आहे. देवगड तालुका हा धार्मिक, सांस्कृतिक व निसर्ग सौंदर्याने थाटलेला तालुका आहे. पुस्तकांचे गाव या योजनेमुळे पोंभुर्ले गावाची ओळख आता आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्याबरोबर पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या पोंभुर्ले-मालपे गावात पर्यटनाच्या दृष्टीकोनातूनही येथील खाडीचा विकास करुन पर्यटक आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी प्रकल्प राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील काळात वेरूळ नवेगाव बांध आणि अंकलखोप येथेही पुस्तकांचे गाव उभारण्या बाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल. हे ऑन वे या वेल्स (इंग्लड) मधील पुस्तकांच्या गावाच्या धरतीवर ही योजना संकल्पना सर्वप्रथम विनोद तावडे यांनी राबविली असल्याचे सांगून आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, विदा करंदीकर यांच्या जन्म गावी असल्याने याचा उपयोग सर्वाना होणार आहे, असे दालन महाराष्ट्रात कोठेही नाही येथील कॉपी अप्रतिम असल्याचा आपल्या भाषणात उलेख केला यांचा मला सार्थ अभिमान वाटतो. असे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमांचे सुत्र संचालन व आभार आप्पा बेलवलकर यांनी मानले.



