साईप्रसाद कल्याणकरांचा आरोप;कवडीमोल दराने शेतकऱ्यांकडून खरेदी…
बांदा ता.०१: सटमटवाडी येथील अत्याधुनिक सीमा तपासणी नाक्याच्या क्षेत्रात पर्यटन स्वागत केंद्र प्रस्तावित नसतानाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलेले उद्घाटन निव्वळ फसवणूक आहे.शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने बळजबरीने संपादित केलेली जमीन बड्या उद्योजकाच्या घशात घालण्याचा पालकमंत्र्यांचा डाव आहे.शासकीय जमीन बड्या उद्योजकाला मोफत व पर्यटन केंद्रासाठी ३८९ लक्ष रुपये देणे म्हणजे शासनाच्या निधीत गैरव्यवहार असल्याचा खळबळजनक आरोप प्रकल्पग्रस्त शेतकरी साईप्रसाद कल्याणकर यांनी केला आहे. तसे लेखी निवेदन त्यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहे.
या नाक्यासाठी शेतकर्यांचा विरोध डावलून तब्बल ३२ एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. शासकीय नियम धाब्यावर बसून तसेच कोणत्याही परवानग्या न घेता नाक्याचे काम सुरू आहे. या गैरव्यवहारात आणखी एका बेकायदा कामाची भर पडली आहे. टोल नाक्याच्या मूळ आराखड्यात प्रस्तावित नसतानाही उद्योजकाच्या घशात शासकीय जमीन घालण्यासाठी पालकमंत्र्यांनी त्याठिकाणी पर्यटन स्वागत केंद्र उभारण्याचा घाट घातला आहे. त्याचे उद्घाटनही आज करण्यात आले.
मुळात त्याठिकाणी अवजड वाहनांची तपासणी होणार आहे. पर्यटन केंद्र झाल्यास टोलनाक्याच्या मुळ उद्देशाला हरताळ फासला जाणार आहे. या विरोधात आपण एनजीटीत दावा दाखल करण्यात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.