दीपक केसरकर;रुग्णालयाचे श्रीपाद नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन…
सिंधुदुर्गनगरी ता.०१: येथे उभारण्यात येत असलेले आयुष रुग्णालय हे रुग्णांना सेवा देण्यासोबतच पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र ठरेल असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले.जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात आज केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ३० खाटांच्या आयुष रुग्णालयाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, नकुल पार्सेकर, संदेश पारकर, संजय पडते, अमरसिंह सावंत, प्रभाकर सावंत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पाटील, आयुषचे वैद्यकिय अधिकारी डॉ. परब, डॉ. कृपा गावडे यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी व स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आज जगभरात योगाचा प्रसार झाल्याचे सांगून पालकमंत्री दीपक केसरकर पुढे म्हणाले की, आयुषमध्ये आयुर्वेदासोबतच पंचकर्म, युनानी, योगा, साध्य या सर्व गोष्टींचा समावेश होतो. आयुर्वेदाची परंपरा जपण्याच्या उद्देशानेच आयुषची निर्मिती करण्यात आली आहे. या आयुषच्या सर्व सोयींनी युक्त असे आयुष रुग्णालय जिल्ह्यात उभे राहत आहे. हे रुग्णालय रुग्णांना बरे करण्यासोबतच या ठिकाणी असणारे पंचकर्म हे पर्यटकांसाठीही आकर्षण ठरेल असा मला विश्वास आहे. आपला जिल्हा हा निसर्ग संपन्न असा पर्टयन जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या शिरपेचात या रुग्णालयाच्या माध्यमातून मानाचा तुरा खोवला जाईल. जिल्ह्यातील रुग्णांना व येणाऱ्या पर्यटकांना भारतीय उपचार पद्धतीचा लाभ घेता येणार आहे.जिल्हा मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरीसाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यापैकी १० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. त्यामाध्यमातून लवकरच जिल्हा मुख्यालयाचा कायापालट होईल. यामध्ये सिंधुदुर्गनगरी येथील तलावामध्ये बोटींगची सोय केली जाणार आहे. तसेच सामाजिक वनीकरणाच्या उद्यानामध्ये छोटेसे रिसॉर्ट उभारण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.
जिल्ह्यातील वनसंपदेचा विचार करता जिल्ह्यात आयुषचे संशोधन केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की,जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यात व सागरी किनारीभागामध्ये आयुर्वेदीक औषधींसाठी उपयुक्त अशी वन संपदा आहे. तसेच ग्रामीण भागात आयुर्वेदाचा प्रसार व्हावा यासाठी जिल्ह्यात १२-आयुर्वेदीक हेल्थ सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न करू, जिल्ह्यात उभारण्यात येत असलेले हे ३० खाटांचे आयुष रुग्णालय दोन वर्षातच रुग्णांच्या सेवेसाठी तयार होईल असे सांगून ते पुढे म्हणाले की,यासाठी लागणारा सर्व निधी वेळेवर उपलब्ध करुन देण्यात येईल. सध्या देश भरात २ हजार आयुर्वेदीक डॉक्टर्स कार्यरत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रस्तावनेमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर म्हणाले की, महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार,पुणे आणि सिंधुदुर्ग अशा चार जिल्ह्यांमध्ये आयुष रुग्णालय उभारण्यात येत आहे.राज्यातील पहिले आयुष रुग्णालय उभारण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याने पटकावला आहे.यावेळी त्यांनी आयुष उपचार पद्धतीविषयी सखोल माहिती दिली.
यावेळी खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांची यथोचित भाषणे झाली.सूत्र संचालन श्री.सावंत यांनी केले.