वेंगुर्ल्यात गणेश भक्तांसाठी निर्माल्य कलशाची सुविधा

2

पालिकेचा उपक्रम :निर्माल्यापासून खत निर्मिती केली जाणार

वेंगुर्ले. ता,३: वेंगुर्ला शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी तसेच नद्या-नाल्यांमधून होणारे प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने गणपती विसर्जन करण्यात येणाऱ्या सहा ठिकाणी नगरपरिषदेतर्फे निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. या निर्माल्य कलशामध्ये जमा होणाऱ्या निर्माल्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी निर्माल्य गणेश विसर्जन स्थळी असलेल्या निर्माल्य कलशामध्ये टाकावे असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले आहे.
स्वच्छ भारत अभियानात वेंगुर्ला नगरपरिषदेने भरीव कामगिरी केली आहे. स्वच्छतेमधील हे सातत्य गणेशोत्सवातही कायम ठेवले आहे. गणपती विसर्जनावेळी नदी, नाल्यांमध्ये विपूल प्रमाणात निर्माल्य जमा होते. साहजिकच अशा निर्माल्यामुळे प्रदूषणही निर्माण होते. नदी-नाल्यांमधून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत वेंगुर्ला शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी गणपती विसर्जनस्थळी भले मोठे निर्माल्य कलश ठेवले आहेत. यामध्ये कॅम्प-पत्र्याचे पूल, वेशी भटवाडी, साकव पूल, मानसी पूल, मांडवी खाडी आणि बर्फ फॅक्टरी आदींचा समावेश आहे. या निर्माल्य कलशामध्ये जमा होणाऱ्या निर्माल्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे.  त्यामुळे गणेशभक्तांनी आपापल्या गणपती विसर्जनावेळी निर्माल्य हे विसर्जनस्थळाच्या बाजूला असलेल्या निर्माल्य कलशामध्ये जमा करुन पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करावे असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले आहे.
सदरचे निर्माल्य कलश विजर्सनस्थळी ठेवताना त्या त्या भागाचे नगरसेवक, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी वैभव साबळे, नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

0

4