जिल्हा परिषदेचे 2019 साठी आठ जणांना उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार

2

एका विशेष पुरस्काराचा समावेश;अध्यक्षा सौ सावंत यांनी केले जाहिर

सिंधुदुर्गनगरी
2019 वर्षामधील जिल्हा परिषद शाळांतील उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी मंगळवारी जाहिर केले. यामध्ये आठ शिक्षकांना उत्कृष्ठ तर एका शिक्षिकेला विशेष पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या एज्युकेशन एक्स्पो या कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहेत, असे सौ सावंत यांनी यावेळी सांगितले.
5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. जिल्हा परिषदेच्यावतीने प्रत्येक शैक्षणिक वर्षात चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार जाहिर करून त्याचे वितरण केले जाते. यासाठी प्रत्येक तालुक्यातून प्रस्ताव मागवुन त्यातील एक या प्रमाणे प्रत्येक तालुक्यात एक शिक्षक पुरस्कार जाहिर केला जातो. यावर्षी देवगड वगळता उर्वरित सात तालुक्यातून दोन-दोन प्रस्ताव उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कारासाठी आले होते. तर देवगडमधून एकच प्रस्ताव आला होता. यातील सर्वोत्कृष्ट काम असलेल्या प्रस्तावाची निवड करीत कोकण आयुक्त यांच्याकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आले होते. ती मंजूरी मिळाल्यानंतर अध्यक्षा सौ सावंत यांनी ही घोषणा केली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर उपस्थित होते. यावेळी प्रथमच नवव्या पुरस्काराची भर पडली असून विशेष पुरस्काराच्या रूपाने हा जाहिर करण्यात आला आहे.
पुरस्कार जाहिर झालेल्या शिक्षकांत कणकवली तालुक्यातील कणकवली नं 3 च्या पदवीधर शिक्षिका सौ प्रतिभा खंडेराव कोतवाल, मालवण तालुक्यातील तोंडवळी वरची शाळेचे पदवीधर शिक्षक परशुराम सीताराम गुरव, सावंतवाडी तालुक्यातील माडखोल धुरिवाडी शाळेचे उपशिक्षक दत्ताराम सातू सावंत, देवगड तालुक्यातील चाफेड नं 1 चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक हरिश्चंद्र कृष्णा सरमळकर, वैभववाडी तालुक्यातील वि. म. लोरे मांजलकरवाडी शाळेचे उपशिक्षक प्रशांत पांडुरंग रासम, वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली नं 1 च्या उपशिक्षका श्रीमती प्रतिमा राजेश पेडणेकर, कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूर नं 1 छे पदवीधर शिक्षक सीताराम गजानन म्हाडग़ुत, दोडामार्ग तालुक्यातील तेरवण नं 1 शाळेचे उपशिक्षक सुनील नारायण फडके यांचा उत्कृष्ठ शिक्षक निवड झाली आहे.

*परिणी बगळे यांना विशेष पुरस्कार*
शासनाच्या आदेशात कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षक यामध्ये सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकाला विशेष पुरस्कार देण्याचे नियोजित आहे. मात्र, हा पुरस्कार आतापर्यंत दिला जात नव्हता. प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर विशेष पुरस्काराची सुरुवात केली असून जिल्हा परिषद अध्यक्षा सौ सावंत यांच्या अध्यक्षतेखालील समितिने यासाठी कुडाळ पडतेवाडी शाळेच्या उपशिक्षिका परिणी संजय बगळे यांची यासाठी निवड केली आहे. उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कारा बरोबरच या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

12

4