निर्मला नदीला पूर;२७ गावांचा संपर्क तुटला,वाहतूक ठप्प…
माणगाव/मिलिंद धुरी.ता,०४:खोऱ्यात आज सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील निर्मला नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे.या पुराचे पाणी नदीवरील ब्रिटिश कालीन पुलावर चढल्यामुळे वाहतुकीस तसेच ये-जा करण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे.ऐन गणेश चतुर्थी काळात ही परिस्थिती ओढवल्यामुळे येथील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.
पंधरवड्यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे या नदीला मोठा पूर आला होता.या पुराचे पाणी सात-आठ दिवस नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावरून वाहू लागल्यामुळे पूल ओलांडण्यासाठी नागरिकांना अडथळा निर्माण झाला होता.दरम्यान या काळात तब्बल २७ गावांचा एकमेकांपासून संपर्क तुटला होता.तर या परिसरातील एसटी वाहतूक पूर्णता ठप्प झाली होती.दरम्यान गेले काही दिवस पाऊस ओसरल्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली होती.मात्र तीच परिस्थिती ऐन गणेशोत्सव काळात पुन्हा ओढवल्यामुळे आता नागरिक सुद्धा हैराण झाले आहेत.त्यामुळे गणेश चतुर्थी काळात याठिकाणी येणाऱ्या चाकरमान्यांना तसेच येथील स्थानिक नागरिकांना बाहेर जायचे असल्यास या पुलावरील पाणी सद्यस्थितीत अडथळा बनत आहे.