फळबागायतदार संघ आक्रमक; योग्य ती जागा दाखवू, विलास सावंतांचा इशारा…
बांदा,ता.०३: बैठकीला येण्याचा शब्द देऊन सुद्धा काजू फळबागायतदारांना दिवसभर ताटकळत ठेवल्याने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा आज बांदा येथे आयोजित बैठकीत फळबागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून जाहीर निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांच्या तोंडाला नेहमीच केसरकरांकडून पाणी पुसण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देवू, असा इशारा फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
काजू हमीभावा संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यासाठी मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गातील फळबागायतदार संघाला आज चर्चेसाठी बैठक आयोजित करण्याच्या सुचना दिली होती. त्या बैठकीला आपण उपस्थित राहू, असा शब्द दिला होता. मात्र आज होणाऱ्या बैठकीत त्या ठिकाणी मंत्री केसरकर उपस्थित राहिले नाही. त्यामुळे त्या ठिकाणी बैठकीसाठी आलेले शेतकरी व बागायतदार दिवसभर ताटकळत राहिले. त्यामुळे केसरकर यांच्या विरोध आणि तीव्र नाराजी व्यक्त केली. गोव्याच्या धर्तीवर येथील काजू बागायताना हमीभाव मिळणे गरजेचे होते. मात्र शासन उदासीन धोरण राबवत आहे. मंत्री केसरकर यांनी वेळेवर उपस्थित न राहता शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ केला आहे. त्यामुळे येथे त्यांना आगामी काळात होणाऱ्या निवडणूकीत योग्य ती जागा दाखवून देऊ, असा इशारा यावेळी विलास सावंत शेतकऱ्यांनी दिला. त्यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यात आली.