बांधकाम व्यावसायिक नव्हे सत्ताधारी आणि काही नगरसेवक बोकाळले…

226
2
Google search engine
Google search engine

 

मंदार केणी ; आरक्षण २१ चा ठराव घिसाडघाईने…

: मालवण शहरातील आरक्षण क्रमांक २१ हे जमीन मालकाला विकसित करण्यास दिलेली परवानगी रद्द करून ती जमीन नगरपालिकेने खरेदी करून नव्याने खासगी वाटाघाटीने आरक्षण विकसित करण्याचा बहुमताच्या जोरावर घेतलेला ठराव हा आकसापोटी, घिसाडघाईने घेतला आहे. यामुळे जमीनमालक गजानन नाईक यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप नगरपालिकेतील विरोधी पक्षाचे गटनेते मंदार केणी यांनी पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान शहरातील बांधकाम व्यावसायिकांना मानसिक त्रास देण्याचे काम होत असून बांधकाम व्यावसायिक नव्हे तर नगरपालिकेतील सत्ताधारी व काही नगरसेवकच बोकाळले असल्याची टीकाही श्री. केणी यांनी केली.
स्वाभीमानच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. नगरपालिकेकडे आरक्षणातील जमीन खरेदीसाठी आवश्यक निधी आहे का? जर निधी उपलब्ध होता तर आरक्षण क्रमांक ४१ मधील कर्मचारी वसाहतीचे आरक्षण खासगी विकासकाला विकसित करण्यास का दिले. मुख्याधिकार्‍यांनी आरक्षण क्रमांक २१ बाबत आपली टिपणी का दिली नाही? नगरपालिका सभेच्या विषयपत्रिकेवर केवळ आरक्षणावर चर्चा करण्याचा विषय असताना ठरावच रद्द करण्याची घाई का करण्यात आली? असे अनेक प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले.
आता नव्याने जाहीर झालेल्या सीआरझेडच्या नकाशात आरक्षण २१ मधील जागा सीआरझेडमधून बाहेर असल्याने जमीन मालकाकडून आता आरक्षण विकसित होण्याची आशा निर्माण झाली होती असे असताना नगरपालिकेच्या सत्ताधार्‍यांनी जमीन मालकाशी चर्चा न करता किंवा पुन्हा प्रस्ताव सादर करण्याची संधी न देता थेट दिलेली परवानगी रद्द करण्याचा ठराव घेतला. त्यामुळे जमीनमालक नाईक यांच्यावर अन्याय झाला असल्याचा आरोप श्री. केणी यांनी केला.
नगरपालिकेतील सत्ताधारी आणि काही नगरसेवक बोकाळलेले आहेत. गेली दोन अडीच वर्षे पालिकेच्या सभागृहात अनधिकृत बांधकाम आणि आरक्षण याच दोन विषयांवर चर्चा होत आहे. ज्या बांधकामांना मुख्याधिकार्‍यांनी परवानगी दिली. तीच बांधकामे अनधिकृत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे काही ठराविक बांधकामांची चौकशी न करता शहरातील सर्वच बांधकामांचा सर्व्हे करून तो अहवाल पालिका प्रशासन पालिकेच्या सभागृहात का सादर करत नाही? त्यामुळे ही सर्व बांधकामे योग्यच आहेत असे स्पष्ट होत आहे. नगरपालिका प्रशासन जर कारवाई करत नसेल तर आरोप करणारे नगरसेवक जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करण्याचे धाडस का दाखवीत नाहीत असा टोला श्री. केणी यांनी यावेळी लगावला.
सत्ताधारी तसेच काही नगरसेवक शहरातील काही बिल्डरांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत. संबंधित बिल्डरांच्या प्रकल्पावर अडचणी निर्माण करून त्यांच्या ग्राहकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करत आहेत. नळपाणी योजनेच्या जोडण्या दिल्या जात नाहीत. प्रशासनही या विषयावर सभागृहात मत मांडत नसल्याचे दिसत आहे. शिवाय आता शहरवासीयांना वारंवार हेच नगरसेवक बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात का बोलताहेत हे समजून चुकले आहेत असा टोलाही केणी यांनी लगावला.