मुंबईत झालेल्या पावसात दोन कामगारांचा बळी…

2

मुंबईत झालेल्या पावसात दोन कामगारांचा बळी…

मुंबई, ता. ५ : मुंबईत गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसाने महापालिकेच्या दोन कामगारांचा बळी घेतला आहे. तसेच कुर्ला येथेही एक जण मृत्युमुखी पडला, तर दादरला पाण्यात तरंगत असलेला एक मृतदेह सापडला. मिठी नदीत पोहण्यासाठी गेलेला एक तरुणही बेपत्ता आहे. विजयेंद्र सरदार बागडी (३६) आणि जगदीश परमार (५४) अशी पालिकेच्या मृत कामगारांची नावे आहेत.
कर्तव्यावर असताना ते पाण्यात पडले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर भागात बुधवारी ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ही घटना घडली. त्यांना चक्कर आली आणि ते पडल्याचे पालिकेचे म्हणणे असून त्यांच्या मृत्यूबाबत अधिक तपास सुरू आहे.
हे दोन्ही कामगार पी/दक्षिण वॉर्डातील कर्मचारी होते. त्यांना बुडल्यानंतर जोगेश्वरी येथील ट्रॉमा रुग्णालय आणि कापडिया रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांना रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दरम्यान, कुर्ला येथे बीकेसीजवळ भारतनगर खाडीत पडून मोहम्मद शाहरुख शाकीब शेख (२४) या तरुणाचा मृत्यू झाला. बुधवारी ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.२० च्या सुमारास ही घटना घडली.
दादरला हिंदमाता येथे सेंट पॉल शाळेजवळ ४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.२५ वाजता एक तरंगणारा मृतदेह पोलिसांनी काढून केईएम रुग्णालयात पाठवला. अशोक दत्ताराम मयेकर (६०) अशी या मृतदेहाची ओळख पटली आहे.

2

4