भाजपच्या काळसेकर, म्हापसेकर यांचा गंभीर आरोप ; जिल्हा नियोजन सभेत चौकशीची एकमुखी मागणी…
सिंधुदुर्गनगरी, ता. ५ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत कोटींच्या निधीचा भ्रष्टाचार झाला आहे. मर्जितील ठेकेदारानाच कामांचे वाटप करण्यात आले आहे. पूर्ण झालेले रस्ते आताच बाद झाले आहेत. या रस्त्यांची चाळण झाल्याने वाहने चालविणे कठीण झालेले आहे, असा गंभीर आरोप भाजपच्या अतुल काळसेकर व राजेंद्र म्हापसेकर यांनी गुरुवारी झालेल्या जिल्हा नियोजन सभेत केला. तसेच गेल्या चार वर्षात झालेल्या या योजनेतील कामांच्या निविदेची वरिष्ठ स्तरावर चौकशी व्हावी, अशी मागणी केली. यावेळी सभागृहात बहुमताने या कामांची चौकशी करण्यासाठी त्रयस्त समिती नेमावी, अशी मागणी केली. यावेळी सभाध्यक्ष तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या कामांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
जिल्हा नियोजनच्या नवीन सभागृहात संपन्न झालेल्या या सभेला आम. वैभव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर आदी व्यासपीठावर तर सतीश सावंत, रणजीत देसाई, संजय पडते आदिंसह अन्य सदस्य उपस्थित होते. या सभेला खासदार, आमदार व लोकनियुक्त तसेच निमंत्रित सदस्यांनी मोठ्या संख्येने दांडी मारली.
माणगाव खोऱ्यासाठी विशेष पॅकेज द्या – सतीश सावंत
काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे व सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे माणगाव खोऱ्यातील सर्व गावांचा संपर्क तुटत आहे. येथील ब्रिज पाण्याखाली जात आहेत. येथील ओहोळानी आपले प्रवाह बदलले आहेत. परिणामी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे माणगाव खोऱ्यासाठी राज्य शासनाकडे स्वतंत्र पॅकेजची मागणी करून येथील ओहोळाना संरक्षक भिंत बांधावी. तसेच रस्त्यातील ब्रिजची उंची वाढवावी, अशी मागणी सतीश सावंत यांनी केली. त्यानुसार सर्व्हे करून राज्य शासनाला पाठविण्याचे आदेश अध्यक्ष केसरकर यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यातील साकवांसाठी होणार सर्व्हे
यावेळी सभागृहात केलेल्या मागणीनुसार जिल्ह्यात आवश्यक असलेल्या साकवांचा सर्व्हे करून त्याचा आठ दिवसात अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे द्या. हा सर्व्हे लघु पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम यांनी सयुक्त करावा, असे आदेश केसरकर यांनी दिले. तसेच अहवाल प्राप्त होताच राज्य शासनाकडे पाठवून स्वतंत्र निधी मागण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
पुरात वाहून गेलेले सर्व रस्ते करणार दुरुस्त
यावेळी रस्त्यांचा विषय येताच केसरकर यांनी आपत्ती व्यवस्थापनाला प्राप्त झालेल्या निधीतून पुराने वाहून गेलेल्या रस्त्यांची दुरुस्ती होणार नाही. यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देण्यात येत आहे. पुरात वाहून गेलेल्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे, असे यावेळी केसरकर यांनी सांगितले.
रस्त्याकडील धोकादायक झाडे तोडण्याचे आदेश
रस्त्याच्या कडेला असलेली झाडे जीवित हानी झाल्यावर तोडणार का ? असा प्रश्न सभागृहात उपस्थित झाला असता पालकमंत्री केसरकर यांनी वनविभाग व सार्वजनिक बांधकाम यांना तुमच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व रास्त्यांवरील धोकादायक झाडे तोडावीत, असे आदेश केसरकर यांनी दिले.
वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयावरून कुबल आक्रमक
वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात २०१६ पासून एकही शस्त्रक्रिया झालेली नाही. २०१८ पासून एकही डॉक्टर नाही. सध्या या रुग्णालयात दिवसाला १२५ पेक्षा जास्त ओपीडी असते. येथे एका डॉक्टरची नियुक्ती करण्यात आलेली आहे पण तो शिक्षणासाठी बाहेर आहे. त्याला कामगिरीवर काढल्याचे दाखविल्याने तेथे दूसरा डॉक्टर मिळत नाही, अशी आक्रमक भूमिका विष्णुदास कुबल यांनी मांडली. यावेळी केसरकर यांनी याबाबत तोडगा काढण्यासाठी चार दिवसात जिल्हाधिकारी दालनात बैठक बोलविण्याचे आदेश दिले.