मनोज पराडकरांचा पुढाकार; “एक्झोबाईटचा ब्रॅण्ड”चा १४ तारखेला शुभारंभ…
सावंतवाडी/नितेश देसाई ता.११: निसर्गा बद्दलचे प्रेम व शेतीची आवड असल्याने फॉरेन बँक मधील नोकरी सोडून वराड येथील मनोज पराडकर यांनी माडखोल येथे विदेशी भाज्यांचा मळा फुलवला आहे. “एक्झोबाईट” या ब्रँडच्या माध्यमातून चेरी, टोमॅटो, ब्रोकली, ऑईस्टर मशरूम, जुकिणी, हॅलेपिनो यांसारख्या ऑरगॅनिक भाज्यांची उत्पादने ते घेत आहेत.
“एक्झोबाईट” या ब्रँडचा १४ एप्रिलला शुभारंभ होत आहे. यावेळी अभिनेते राजेंद्र शिसदकर, डॉ. प्रसाद देवधर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्गातील युवकांनी नोकरी शोधण्यापेक्षा शेतीच्या माध्यमातून रोजगार निर्माण करावा हा आपला हेतू असून येत्या ३ वर्षांत २५० ते ३०० स्थानिकांना रोजगार देण्याचा मानस श्री. पराडकर यांनी व्यक्त केला आहे.
पराडकर हे आपल्या फार्म मध्ये ८०० स्क्वेअरफुट जागेत ऑईस्टर मशरूमचे उत्पादन घेत आहेत. गोवा व सिंधुदुर्गातील मार्केटचा अभ्यास करून त्यांनी या ऑरगॅनिक उत्पादनाला सुरुवात केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या अळंबीचे उत्पादन घेऊन प्रत्येक तरुण महिन्याला ६० हजार रुपये कमवू शकतो. त्याबरोबरच फार्म मध्ये उभारलेल्या पॉलिहाऊस मध्ये ते विदेशी भाज्यांचे उत्पादन घेत आहोत. ८ गुंठ्यांमध्ये असलेल्या पॉलीहाऊस मध्ये ते ६ ते ७ प्रकारच्या विदेशी भाज्यांचे उत्पादन घेत आहोत. याबरोबरच त्यांच्या या भाज्यांना सावंतवाडी मार्केटमध्ये मागणी वाढत आहे. येत्या २ ते ३ वर्षात सिंधुदुर्ग व गोव्यातील पूर्ण मार्केट कव्हर करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. याकरिता सिंधुदुर्गातील युवकांनी आपल्याशी संपर्क साधून ऑईस्टर मशरूमच्या माध्यमातून आपला नवीन स्टार्टअप सुरू करावा, असे ते म्हणाले.
यासाठी लागणारी साधने आपल्या द्वारे पुरवली जातील, असे त्यांनी सांगितले. यासोबतच १४ एप्रिलला होणाऱ्या “एक्झोबाईट” या ब्रँडच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.