समुद्रही खवळला : मासेमारी ठप्प ; गणेशोत्सवात पावसाचे मोठे विघ्न…
मालवण, ता. ५ : गणेशोत्सवात संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर आज अधिकच वाढला. येथील किनारपट्टीसह तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. समुद्र खवळला असून मासेमारी पूर्णतः ठप्प झाली आहे.
जिल्ह्यातील कर्ली, कालावल या दोन्ही खाड्या तसेच अन्य नद्याही पुररेषेवरून वाहत आहेत. पाण्याची पातळी वाढल्यास किनाऱ्यालगतच्या गावांना व शेतीला पुन्हा पुराचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
गणरायाच्या आगमनाला आलेल्या पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. गेले दोन दिवस पावसाचा जोर अधिक वाढला आहे. गणेशोत्सवाला आलेल्या चाकरमान्याचेही हाल झाले आहेत. रेल्वे, बस यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. काही गावात छोटे पूल पाण्याखाली गेल्याने त्याचाही परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. वीज पुरवठाही सातत्याने खंडित होत आहे. एकूणच ऐन उत्सवात पावसाने मोठे विघ्न आणले आहे.
महिन्याभरापूर्वी आलेल्या पुरात तोंडवळी, काळसे, खोतजुवा, मसुरे, देवबाग याठिकाणी पाणी भरले होते. काही ठिकाणी घरात पाणी घुसले होते. सध्या सुरू असलेल्या पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास किनाऱ्यावरील वाडी वस्तीना पुराचा धोका पोचण्याची शक्यता आहे. खोत जुवा बेटावर पुन्हा पाणी घुसण्यास सुरवात झाली आहे. घरात गणपती असल्याने येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत.
सिंधुदुर्ग (कोकण) गोवा किनारपट्टी भागात समुद्र खवळला आहे. लाटांचा जोर वाढला आहे. समुद्रात ७५ किलोमीटर पर्यंत ही स्थिती आहे. तसेच ४५ ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. तरी मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा सावधतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. ज्या मच्छीमारांनी नव्या मासेमारी हंगामात मासेमारीसाठी समुद्रात लोटलेल्या बोटी सुरक्षित स्थळी हलवल्या आहेत. समुद्रातील ही स्थिती आणखी दोन दिवस कायम राहील असे मच्छीमारांनी सांगितले.