१३ अधिकारी कार्यरत : नागरिकांचे हाल…
सिंधुदुर्गनगरी, ता. ६ : ५ सप्टेंबर पासून महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेने जाहिर केलेल्या बेमुदत संपात जिल्ह्यातील महसुल अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयासह तालुका तहसीलदार कार्यालयातील महसुल यंत्रणा सुणीसुणी झाली आहे. कार्यरत ३४२ अधिकारी-कर्मचारी पैकी तब्बल २९६ अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले आहेत. परिणामी कामानिमित्त जिल्हाधिकारी अथवा तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांना माघारी परतावे लागत आहे. विशेषता चाकरमान्यांचा यात मोठ्या संख्येने समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटना, सिंधुदुर्गच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे यांना बेमुदत संपावर जाण्याबाबतचे लेखी निवेदन सादर करण्यात आले होते. महाराष्ट्रातील सर्व महसुल कर्मचारी तसेच सर्व पदोन्नत नायब तहसिलदार हे देखील या संपामध्ये सहभागी झाले आहेत. यापुर्वी शासनाच्या निषेधार्थ दुपारच्या जेवणाच्या वेळेमध्ये कार्यालयासमोर निदर्शने करुन वस्तुस्थिती दर्शक फलक (बॅनर) लावणे, घंटानाद आंदोलन, काळया फिती लावुन कामे करणे तसेच कार्यालयामध्ये सायंकाळी एक तास जादा काम करुन शासनाचा निषेध नोंदविणे, अशा प्रकारे टप्पानिहाय आंदोलन महसुल कर्मचारी यांनी करुन देखील शासनाकडुन दखल घेतली गेली नाही. त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील कोल्हापुर , सांगली व सातारा या जिल्हयातील पुरपरिस्थीतीमुळे पुराग्रस्तांचे पुनर्वसन, स्थलांतर, आपद्ग्रस्तांना मदतीचे वाटप, पंचनामे आदि बहुतांश कामे हे महसुल अधिकारी कर्मचारी यांना करणे आवश्यक असल्याने १६ ऑगस्ट रोजीचे लेखणीबंद आदोलन रद्द करण्यात आलेले होते. त्यानंतर सामुदायिक रजा आंदोलन, एक दिवसाचा लाक्षणिक संप व संपावेळी रक्तदान यासारखी आंदोलने महसुल कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आली. परंतु महसुल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सन्माननीय तोडगा न निघाल्याने ५ सप्टेंबर पासुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महसुल कर्मचारी तसेच सर्व पदोन्नत नायब तहसिलदार बेमुदत संपामध्ये सहभागी झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसुल विभागात गट ब पदाची ४०, गट क पदाची २८८ व गट ड पदाची १०१ पदे मंजूर असून त्यातील गट ब पदाची ३४, गट क पदाची २४२ व गट ड पदाची ६६ पदे भरलेली आहेत. यातील गट ब पदाची ४, गट क पदाची २३ व गट ड पदाची ६ असे एकूण ३३ अधिकारी-कर्मचारी पूर्व परवानगीने सुट्टीवर आहेत. तर केवळ गट ब पदाचे १३ अधिकारी सेवेत हजर आहेत. तर गट ब पदाचे १७ अधिकारी, गट क पदाचे २१९ कर्मचारी व गट ड पदाचे ६० कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.
जिल्ह्यात एकीकडे ग्रामसेवक विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास थांबला आहे. आता महसुल अधिकारी-कर्मचारी संपावर गेल्याने ‘दुष्काळात तेरावा महीना’ अशी स्थिती झाली आहे.