Thursday, June 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यापुन्हा आशिर्वाद द्या, जिल्ह्याचे नाव जगाच्या नकाशावर झळकवेन...

पुन्हा आशिर्वाद द्या, जिल्ह्याचे नाव जगाच्या नकाशावर झळकवेन…

नारायण राणे; तळवडेतील कुंभार समाज बांधवाचा भाजपात प्रवेश…

सावंतवाडी,ता.१४: गेली ३४ वर्षे मी जिल्ह्यात काम करीत आहे. इथल्या लोकांनी आशिर्वाद दिल्याने सर्व पदे भोगली आता पुन्हा आशीर्वाद दिलात तर आपला जिल्हा देशाच्या नकाशावर झळकविण्यासाठी प्रयत्न करेन, असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या माध्यमातून तळवडे जिल्हा परिषद मतदार संघात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवी मडगावकर,भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, भाजपच्या जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा ॲड. निता सावंत, खरेदी विक्री संघ चेअरमन प्रमोद गावडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बबन राणे, संदीप कुडतरकर, माजी सभापती पंकज पेडणेकर, प्रियांका गावडे, निरवडे सरपंच सुहानी गावडे, माजी जि. प. सभापती गुरुनाथ पेडणेकर, माझी जि. प. सदस्या निकिता जाधव, दादा परब, बाळा जाधव आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
ही लोकसभा निवडणूक आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाचे नेतृत्व करीत आहेत. मोदींमुळे आज आपल्या देशाला संपूर्ण जगात एक मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. मागील दहा वर्षात विविध योजना राबवून या देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. सर्व जाती धर्मांना एकत्र आणून देश एकसंघ करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या या प्रयत्नांना यश देण्यासाठी तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे. त्यासाठी मोदींच्या ‘४०० पार ‘ या घोषणेला साथ देण्यासाठी महायुतीचा येथील खासदार निवडून द्या असे आवाहन देखील त्यांनी केले.
आज येथील कुंभार समाजातील बांधवांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. कुंभार समाज तसेच येथील इतर बारा बलुतेदार यांच्या आर्थिक उन्नतीसाठी पि एम विश्वकर्मा योजना मोदींनी आणली आहे. माझ्या खात्याच्या माध्यमातूनच या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. पूर्वी कुंभार समाज फक्त पारंपारिक भांडी बनवायचं काम करीत असे. मात्र, आता मशिनरी द्वारे काम करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. गावातील व्यवसाय शहरापर्यंत व त्यानंतर राज्य व देशापर्यंत पोहोचवावेत यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच कुंभार समाज व अन्य समाजांच्या माध्यमातून पीएम विश्वकर्मा योजनेतून माझ्या खात्याकडे १२ लाख कोटींची मागणी करण्यात आली आहे. तुम्हीही अर्ज करा तुम्हाला प्रशिक्षण दिले जाईल व आवश्यक मशिनरी व कर्ज पुरवठा केला जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आपला कोकण विभाग हा शेतीप्रधान आहे. शेती बरोबरच आंबा, काजू, फणस, कोकम, करवंदे अशी विविध फळे व कोकणी मेवा येथे उपलब्ध आहे. पाऊस पडल्यानंतर ही सर्व फळे वाया जातात. त्यामुळे या फळांवर ‘फळ प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून प्रक्रिया करून टिकाऊ उत्पादने तयार करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत. तुमच्या प्रयत्नांना आमची साथ निश्चितच लाभेल. कारण येथील शेतकरी बागायतदार आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावेत, सक्षम व्हावेत हीच माझी इच्छा आहे.
मी साहेब नाही, मी देखील तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलो. त्यामुळेच येथील जनतेबाबत माझ्या मनात नेहमीच प्रेमाची व आपुलकीची भावना राहिली आहे. येथील जनतेनेही माझ्यावर नेहमी प्रेम केले आहे व आशीर्वाद दिले आहेत. हे तुमचे आशीर्वाद याही पुढे कायम राहतील व या निवडणुकीतही मोठे यश मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
भारतीय जनता जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. आज आपण केंद्रात व राज्यात सत्तेत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी आपल्या सोबत आहे. त्यामुळे मिळणारे यश हे देखील तेवढच मोठं असायला हवं. कारण ‘ खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी’ हा माझा स्वभाव आहे. त्यासाठी मला केवळ निवडून येणं अपेक्षित नसून दोन ते अडीच लाखांच्या मताधिक्याने विजय व्हायला हवा त्यासाठी कामाला लागा अशा सूचनाही त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments