अरविंद मोंडकर यांची टीका…
मालवण, ता. ६ : महाराष्ट्रातल्या मावळ्यांनी रक्ताचे पाणी करून उभारलेले महाराष्ट्रातील २५ किल्ले या दळभद्री फडणवीस सरकारने ३ सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे किल्ले लग्न समारंभ आणि पार्ट्यांसाठी भाड्याने देण्याचा निर्णय घेतला. उद्या या ठिकाणी दारूची विक्री देखील केली जाईल त्यामुळे
भाजप शिवसेना युती सरकारचा आम्ही जाहीर निषेध करत असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसचे प्रवक्ता अरविंद मोंडकर यांनी म्हटले आहे.
पक्षप्रेमापुढे शिवरायांचे २५ गडकिल्ले भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयावर डोळेझाक करणाऱ्या या युती सरकारने नैतिकता गमावली आहे. या सरकारने स्वतःला शिवभक्त म्हणवू नये व छत्रपतीच्या नावाने मतांचा जोगवा देखील मागू नये.
स्वराज्यातील गडकोट-किल्ले हे मराठी माणसासाठी मंदिरासमान आहे. महाराजांच्या नावाने मते मागून सत्तेवर आलेल्या या लाचारांनी आता थेट महाराजांच्या किल्ल्यांचा अप्रत्यक्षरीत्या लिलाव करायचाच घाट घातला असल्याची टीकाही श्री. मोंडकर यांनी केली आहे.