गजानन नाईक; स्व. ॲड. दीपक नेवगी स्मृति पुरस्काराने सन्मान…
सावंतवाडी,ता.१८: लोकशाहीचे चारही स्तंभ पोखरले गेले आहेत याची खंत वाटते, बदलत्या काळात व्यवसायाच्या दृष्टीने पत्रकारितेकडे पाहिले जात आहे, त्यामुळे पत्रकारिता ही कला जोपासली गेली पाहिजे असे मत ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक यांनी व्यक्त केले.
सावंतवाडी येथील श्री राम वाचन मंदिराच्या १७२ व्या वर्धापन दिनानिमित्त स्व. ॲड. दीपक नेवगी स्मृति पुरस्काराने पत्रकार गजानन नाईक यांना सन्मानित करण्यात आले, या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुंबईचे जेष्ठ पत्रकार व व्याख्याते विवेक मेहेत्रे, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जी. ए. बुवा, प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर, कार्यवाह रमेश बोंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री. नाईक यांना शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. श्री. नाईक पुढे म्हणाले की, श्री राम वाचन मंदिराच्या १७२ व्या वर्धापन दिनानिमित्त ॲड. दीपक नेवगी यांच्या कुटुंबीयांकडून मला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे, हे मी माझे भाग्य समजतो, दीपक नेवगी हे माझे अगदी जवळचे मित्र होते, त्यामुळे त्यांच्या नावाने हा पुरस्कार स्वीकारताना मला अतिशय आनंद होत आहे, माझ्या वृत्तपत्रातून अनेक वेळा त्यांनी कायदेविषयक लेखन केले होते त्यामुळे त्यांच्या आठवणी अजूनही माझ्यासोबत आहेत.
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जन्मदाते बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्र काढले आणि आम्ही या वृत्तपत्र क्षेत्रात आलो त्यामुळे त्यांचे स्मारक होण्यासाठी माझा हातभार लाभला हे माझ्यासाठी भाग्याचे आहे. ५२ वर्षे माझा पत्रकारितेतील प्रवास हा अतिशय आनंददायी होता, अनेक अनुभव मी यातून घेतले. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो परंतु अलीकडच्या काळात हे चारही स्तंभ पोखरल्याचे दिसून येते, अनेक मोठमोठ्या कंपन्या पत्रकारिता क्षेत्रात येऊन व्यवसाय करत आहेत, त्यामुळे पत्रकारिता ही कला संपुष्टात येऊ नये याची भीती वाटते, असे ते यावेळी म्हणाले.
पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमानंतर वर्धापन दिनानिमित्त आयोजित विवेक मेहत्रे यांच्या “ती गेली कुठे ?” या व्याख्यानाला सुरुवात करण्यात आली, यावेळी मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.