श्रमिक संघटनेच्यावतीने ९ रोजी मुंबई गिरणगाव येथे जनजागृती
वैभववाडी.ता,७: मागील पाच वर्षात युती शासनाने गिरणी कामगार घराच्या बांधकामाची एक विट ही लावली नाही. सत्तेवर येताच त्यांना गिरणी कामगारांचा विसर पडला आहे. अजूनही जवळपास ९० टक्के गिरणी कामगार व वारसदार हक्काच्या घरापासून वंचित आहेत. सत्ताधार्यांच्या दुटप्पी भूमिकेविरोधात तसेच गिरणी कामगारांचे मुंबईतच घरे देऊन पुनर्वसन करा. या मागणीसाठी गिरणी कामगार सर्व श्रमिक संघटना यांच्यावतीने सोमवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी मुंबई गिरणगाव येथे जागृती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा दुपारी तीन वाजता लोअर परेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान (वरळी) अशी निघणार आहे. अशी माहिती सर्व श्रमिक संघटनेने प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
गिरणी कामगारांचे आम्हीच कैवारी असे भासवणाऱ्या शिवसेना-भाजप पक्षाच्या नेत्यांना युतीची सत्ता येताच गिरणी कामगारांचा विसर पडला आहे. सर्व पात्र गिरणी कामगारांना घरे दिली जातील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र त्यांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. गिरणीची जागा मालकांच्या घशात घालून गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर फेकण्याचे षडयंत्र शासनाकडून सुरू आहे. हे गिरणी कामगार कदापीही सहन करणार नाही. मुंबईमधील घरासाठी गिरणी कामगार व वारस अखेरच्या श्वासापर्यंत लढा सुरूच ठेवतील. असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
मुंबई व उपनगरात शहर जमीन कमाल कायद्यानुसार २८०० एकर जमीन उपलब्ध आहे. ही जमीन गिरणी कामगारांच्या घराकरिता द्या. अशी वारंवार मागणी सर्व श्रमिक संघटनेने केली आहे. सदर जमीन बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव शासनाचा आहे.
या जागृती यात्रेत गिरणी कामगार नेते बि.के. आंब्रे, उदय भट, विजय कुलकर्णी, दत्तात्रय अत्याळकर, दत्तात्रय ताकवणे, संतोष मोरे सहभागी होणार आहेत. तरी या जागृती यात्रेत सर्व गिरणी कामगार व वारसांनी सहभागी व्हावे असे आवाहन सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.