अपघाताची भिती:तात्काळ उपाययोजना राबवा,प्रवाशांची मागणी…
येथील मळगाव घाटीतील धोकादायक वळणावर शिरोडा-सावंतवाडी या राज्य मार्गाचा काही भाग खचला आहे.खालची माती दरीत वाहून गेल्याने त्या ठीकाणी अपघात होण्याची शक्यता आहे.आंबोली घाटात जी परिस्थिती निर्माण झाली तीच परिस्थिती या ठिकाणी होऊ शकते अशी भीती वाहनधारकांकडून व्यक्त करण्यात येत असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य ती भूमिका घ्यावी अशी मागणी होत आहे.
गेल्या दोन ते तीन आठवड्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे सावंतवाडी दोडामार्ग मधील अनेक भागात रस्ते,डोंगर खचल्याचे प्रकार घडले होते.यात ज्याप्रमाणे आंबोली येथील मुख्य धबधब्याच्या ठिकाणी रस्ता खचला तसाच काहीसा प्रकार मळगाव घाटीत घडला आहे.रस्त्याच्या खालचा मातीचा भाग पूर्णपणे खचला असून त्यातील माती दरीत वाहून गेली आहे.त्यामुळे रस्ता खचण्याची भीती व्यक्त होत आहे.पुढील संकट लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम आणि वनविभागाने योग्य ती भूमिका घ्यावी अशी मागणी प्रवाशांतून करण्यात येत आहे.