कामगाराच्या मुलीच्या लग्नासाठी शासनाचा ५१ हजाराचा “आहेर”…

2

हरी चव्हाण ; किट संच वाटपास १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ…

मालवण, ता. ८ : महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाजवळ नोंदीत असलेल्या बांधकाम कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी ५१ हजार रुपये देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुबंई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे अशी माहिती बांधकाम कामगार महासंघ प्रदेश संघटनमंत्री हरी चव्हाण यांनी दिली.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाची बैठक बांधकाम मंत्री संजय कुटे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झाली. या बैठकीस कामगार प्रतिनिधी श्रीपाद कुटास्कर, वेदा आगरे, प्रमुख कामगार विभाग अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. या चर्चेत प्रामुख्याने भारतीय मजदूर संघाने केलेल्या मागणीला प्रतिसाद देत मंडळाने नोंदीत असलेल्या बांधकाम कामगारांच्या मुलीला विवाहासाठी ५१ हजार रुपये अनुदान देण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे अशी माहिती श्री. चव्हाण यांनी दिली.
अत्यावश्यक साहित्याचे किट वाटप ३१ ऑगस्टला बंद करण्यात आले होते. याला अनुसरून मजदूर संघाने मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार कामगार विभागाच्या उपसचिवांनी १५ सप्टेंबरपर्यंत किट संच सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना वाटप करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे अशी माहितीही श्री. चव्हाण यांनी दिली.

15

4