पावसामुळे वेंगुर्ल्यात पाच घरांचे तीन लाखाचे नुकसान

2

वेंगुर्ले : ता.८: शनिवारी जोरदार वाऱ्यासह व संततधार पडलेल्या पावसामुळे वेंगुर्ला तालुक्यात तीन घरांवर एकच आंब्याचे झाड पडून तर दोन घरांवर भित पडून एकूण सुमारे ३ लाख ९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शनिवारी सकाळी ८.३० ते रविवारी सकाळी ८.३० पर्यंत तालुक्यात १५८.६ मी.मी. तर आत्तापर्यंत तालुक्यात एकूण ४१४४.४ मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.
गणेश चतुर्थीच्या सहाव्या दिवशी पावसाने संततधारेला सुरुवात केली. संपूर्ण दिवस पडणाऱ्या पावसाने सायंकाळीनंतर तालुक्यातील सर्वच ओहोळ, नदी-नाले तुडुंब भरुन वाहत होते. वेंगुर्ला तुळस मार्गे सावंतवाडी मार्गावरील होडावडा-तळवडे नदीच्या पुलावर पाणी आल्याने एस.टी.सहीत सर्व गाड्या मातोंड मार्गे वळविण्यात आल्या. तर सायंकाळी वेंगुर्ला शहरातील राऊळवाडा येथील रहिवासी नंदकिशोर नारायण वेंगुर्लेकर, रेखा नारायण वेंगुर्लेकर व प्रियदर्शन भानुदास राऊळ या तिघांच्या घरावर शेजारी असलेले एक आंब्याचे भले मोठे झाड कोसळले. यात नंदकिशोर वेंगुर्लेकर व रेखा वेंगुर्लेकर यांचे अनुक्रमे ६७ हजार आणि ७१ हजार तर प्रियदर्शन राऊळ यांचे सुमारे १ लाख ८ हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच भटवाडी-किनळणेवाडी येथील श्रीमती अनिता अशोक पिगुळकर यांच्या रहात्या मातीच्या घराची भींत पडून ४८ हजार रुपयांचे नुकसान झाले. शहर तलाठी व्ही.एन.सरवदे यांनी या नुकसानीचा पंचनामा केला. कोचरा-भटवाडी येथील प्रकाश बापू हळदणकर यांच्या मातीच्या घरावर भित पडून १५ हजार रुपयांचे नुकसान झाले. याचा पंचनामा कोचरा तलाठी एस.आर.चव्हाण यांनी केला.
दरम्यान, वेंगुर्ला शहरातील नंदकिशोर वेंगुर्लेकर व रेखा वेंगुर्लेकर यांच्याकडील गणपतीचे पाच दिवसांनी विसर्जन झाले होते. तर प्रियदर्शन राऊळ यांच्या घरात गणराय विराजमान होते. मात्र, स्थानापन्न करण्यात आलेल्या गणपतीपासून काही अंतरावर स्वयंपाक खोलीवर हे झाड पडले. तिघांच्या घरावर झाड पडल्याचे समजताच राऊळवाडा व अन्य ठिकाणच्या नागरीकांनी धाव घेत मदत कार्य केले.

2

4