वस्तीत येणार्‍या वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी ३५ पाणवठे उभारले…

439
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी वनविभागाचा पुढाकार; नरेंद्र डोंगरासह अन्य परिसरातील जंगलाचा समावेश…

सावंंतवाडी,ता.१२: वस्तीकडे येणार्‍या वन्य प्राण्यांना रोखण्यासाठी सावंतवाडी वनविभागाच्या परिक्षेत्रात येणार्‍या जंगलात तब्बल ३५ ठिकाणी पाणवठे तयार करण्यात आले आहे. झर्‍याचा आधार घेवून ही उपाययोजना राबविण्यात आली आहे. यासाठी वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यात नरेद्र डोंगरासह नेमळे, ब्राह्मणपाट, कुभांर्ली, तांबुळी कोलगाव, माजगाव, इन्सुली, कुणकेरी आदी जंगलातील भागात हे पाणवठे उभारण्यात आले आहेत. याबाबतची माहिती सावंतवाडी वनविभागाचे वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर यांनी दिली.

गेले काही दिवस जंगलात राहणारे प्राणी वस्तीकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या प्राण्यांना जंगलात खाद्य आणि मुख्य करुन पाणी मिळत नसल्यामुळे ही समस्या निर्माण झाली. हे लक्षात आल्यानंतर सावंतवाडी वनविभागाच्या पुढाकारातून हे पाणवठे तयार करण्यात आले आहेत. यासाठी काही ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तर काही ठिकाणी वनविभागाच्या पुढाकाराने हे पाणवठे तयार करण्यात आले.

याबाबत श्री.क्षिरसागर म्हणाले, वन्यप्राणी वस्तीकडे येत असल्याने अनेकांची नाराजी आहे. त्या प्राण्यामुळे अपघात किंवा हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकार लक्षात आल्यानंतर उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्या दृष्टीने सावंतवाडी वनविभागाच्या क्षेत्रात येणार्‍या जंगलात हे पाणवठे उभारण्यात आले आहेत. काही ठिकाणी तर असलेल्या पाणवठ्याचे खोलीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना पाण्याची व्यवस्था जंगलात झाल्यामुळे ते प्राणी त्याच ठिकाणी स्थिरावतील आणि वस्तीत येणार नाहीत. यासाठी आमचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.