पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अखंड लोकमंच आणि जिल्ह्यातील चित्रकारांच्या वतीने आयोजन
कणकवली, ता.९ : सिंधुदुर्ग रत्नागिरीसह राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीत घरे, गोठे आणि संसार वाहून गेले. या नैसर्गिक आपत्तीत मदतीचा हात देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाकारांनी ‘ओलावा चित्र प्रदर्शन’ करून मदत निधी जमा करण्याचा संकल्प केला आहे. हे चित्र प्रदर्शन उद्या १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कणकवली बाजारपेठ पटकीदेवी मंदिर नजिक स्वामी आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे.
चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते होणार आहे. हे प्रदर्शन ११ दिवस चालणार आहे. अखंड लोकमंच सिंधुदुर्गच्या वतीने या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘ओलावा चित्र प्रदर्शना’ च्या निमित्ताने १० सप्टेंबर रोजी १० वाजता जिल्ह्यातील कलाकारांशी संवाद सादला जाणार आहे. यात चित्रकार सुमन दाभोलकर आणि छायाचित्रकार इंद्रजित खांबे सहभागी होणार आहेत. यादरम्यान ललित अकादमी दिल्ली चा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेल्या श्रीपाद गुरव यांचा जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता कवि-लेखक यांच्यासोबत चित्रकारांचा व कला रसिकांचा संवाद आयोजित करण्यात आलेला आहे. यात कवि अनिल धाकु कांबळी, मोहन कुंभार आणि गझलकार मधुसुदन नानिवडेकर यांचा सहभाग राहणार आहे. प्रतिदिवशी हे प्रदर्शन सकाळी ९ ते सायंकाळी ८ यावेळेत चालणार आहे. या ‘ओलावा चित्र प्रदर्शना’ ला जिल्ह्यातील चित्र प्रेमी व सर्व नागरिक, विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन अखंड लोकमंचाचे अध्यक्ष नामानंद मोडक यांनी केले आहे.