दीपक केसरकर:यापुढे साळगावकर माझे राजकीय वारसदार नाहीत…
सावंतवाडी ता.१०: नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी थोडी सबुरी घेतली असती तर माझे पुढचे ते राजकीय वारसदार असते,मात्र त्यांनी टोकाची भूमिका घेतली आहे.मी त्यांच्या विरोधात काही बोलणार नाही,मात्र यापुढे ते माझे राजकीय वारसदार नसतील असा दावा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केला.माझ्याकडे कोणतीही जादू नाही,जी काही लढाई आहे ती प्रेमाची आहे.प्रेमाने जग जिंकता येते या वाक्यावर आजपर्यंत माझा प्रवास सुरू राहिला.ती जर त्यांना अडचण वाटत असेल तर आता मी काय बोलू असा उलट प्रश्नही श्री.केसरकर यांनी उपस्थित केला.
पालकमंत्री दीपक केसरकर हे माझ्यामुळेच मंत्री बनले,ते उत्तम नाटककार तसेच जादूगार सुद्धा आहेत,अशी टीका नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पालकमंत्री केसरकर यांच्यावर केली होती.याला श्री.केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले.ते पुढे म्हणाले,साळगावकर यांना माझ्याविरोधात निवडणूक लढवायची असेल,तर त्यांनी खुशाल लढवावी.मी त्यांच्याशी कोणताही वाद घालणार नाही.ते माझे जुने मित्र आहेत.शेवटपर्यंत मी माझी मैत्री तशीच ठेवणार आहे.
त्यादिवशी मी साळगावकरांची हॉटेलवर जाऊन भेट घेतली,त्या ठिकाणी कोणती जादू केली नाही.निवडणूक माझ्या विरोधात लढणार तर खुशाल लढा तसेच विकासाच्या आड आमचा वाद येऊ देऊ नका,असे त्यांना मी सांगितल.परंतु त्यांनी त्या गोष्टीचा विपर्यास केला.श्रद्धा सबुरी च्या मंत्रावर ते ठाम राहिले असते तर आज त्यांना फायदा झाला असता.भविष्याचे माझे ते राजकीय वारसदार ठरले असते.
मी साईबाबांचा भक्त आहे,त्यामुळे मला आणखी कोणत्या जादूची गरज नाही.त्यांनी कितीही राजकीय विरोध केला तरी ते माझे राजकीय विरोधक होऊ शकत नाहीत.आतापर्यंतची माझी लढाई ही नारायण राणे यांच्या विरोधात होती.परंतु राणेंची आणि साळगावकर यांची तुलना होऊ शकत नाही.मी त्यांच्या विरोधात काही बोलणार नाही.परंतु कोणी शंभर अपघात होऊ देऊ नये.साळगावकरांना माझ्या शुभेच्छा आहेत त्यांनी आपली कारकीर्द चांगली राखावे मला राजकारण करण्यापेक्षा आता पूरग्रस्तांचे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे त्यादृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहे.त्यामुळे आत्ताच काही बोलू इच्छित नाही असेही केसरकर म्हणाले.
यावेळी राजन पोकळे,मायकल डिसोजा,श्रुतिका दळवी,अपर्णा कोठावळे,नीता कविटकर,अनारोजीन लोबो आदी उपस्थित होते.