अनधिकृत सुरू असलेल्या खाणींवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन…

108
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी मनसेचा महसुलला इशारा; प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप…

बांदा,ता.२२: सावंतवाडी तालुक्यात सोनुर्ली, वेत्ये परिसरात असलेल्या अनधिकृत क्रशरवर कारवाई करा, अशी मागणी सावंतवाडी मनसेच्या माध्यमातून तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. या ठिकाणी गेले अनेक दिवस रात्रंदिवस चुकीच्या पद्धतीने खाणी चालवल्या जात आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे यावर तात्काळ कारवाई करा, अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी दिला आहे.

याबाबत त्यांनी निवेदन सादर केले आहे. यात असे म्हटले की, सावंतवाडी तालुक्यात दगड खाणी मोठ्या प्रमाणात चालू आहेत. यामध्ये सोनुर्ली, व्येत्ये, इन्सुली, विलवडे, वाफोली आदी भागांमध्ये क्रशर, क्वारी रात्रंदिवस चालू असतात शासन नियमानुसार सूर्योदयापासून सूर्योदय अस्त होईपर्यंत दगड खाणी चालू असावेत. परंतु या खाणीरात्रंदिवस सुरू असतात. या खाणींमध्ये बेकायदेशीर मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जाते. आणि दिवसाढवळ्या सोनुर्ली, वेत्ये येथील दगडखाणी वरून निगुडे मार्गे सकाळी ६ वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत गोवा राज्यात विनापास ५० ते ६० डंपर दररोज वाहतूक केली जाते. नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार पोलीस पंचनामा अनाधिकृत वाहतूक होत असताना करणे गरजेचे आहे. परंतु आपण परस्पर वाहनांवर कारवाई करून सोडतात. त्याचप्रमाणे विलवडे वाफोली गावात मोठ्या प्रमाणात अशाच दगड खाणी मधून बोअर ब्लास्टिंग होते. त्याचा धोका वाफोली धरणाला होऊ शकतो. भविष्यात धरणाला काही धोका निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहील. या अशा अनेक गावातून या दगडखणी क्रशर, चिरेखाणी विरोधात तक्रारी आपल्याकडे आले असताना कारवाई होताना दिसून येत नाही. सोनुर्ली येथील दिलीप बिल्डकॉन या कंपनीचे उत्खनन करण्याची मुदत संपली असून ती कंपनी तिथून निघून गेली व त्या ठिकाणी ५० फूट असलेली खाण न बुजवता न झाडे लावता अशीच टाकून गेले. नियमानुसार एखादी खाण बंद झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी भराव टाकून झाडे लावणे बंधनकारक आहे. याला जबाबदार कोण? गौण खनिज वाहतुकीबाबत दंडात्मक कारवाई करण्यात महसूल प्रशासन एवढी उदासीनता का दाखवते? जर परवानगी आपल्या स्तरावरून ५०० ब्रास दिली जाते तर कारवाई करण्यास विलंब का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. किती खाण मालक शासनाच्या अटी शर्तीचे पालन करताना दिसतात हे आपण दाखवावे इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये सुद्धा मायनिंग मोठ्या प्रमाणात चालू आहे. चिरेखाणी, वाळू आपल्या तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने चालू आहेत. बांदा तेरेखोल नदी पात्रात दिवसाढवळ्या वाळू काढली जाते. त्याच्यावर कोणतीही कारवाई नाही शासनाकडे १००० ब्रास उत्खनन करण्यासाठी रॉयल्टी जमा करायची. आणि ५००० ब्रास उत्खनन करायचे असे प्रकार या सावंतवाडी तालुक्यात चालू आहेत.

याबाबद तहसीलदार श्रीधर पाटील यांनी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले की नायब तहसीलदार मनोज मुसळे यांच्या नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी, तलाठी यांचे पथक नेमून संबंधित यंत्रणेची मोजमाप घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे निरवडे येथील धरलेल्या बॉक्साइड वर सहा लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करून रॉयल्टी जमा केलेली आहे. आपल्या निवेदनाची लवकरात लवकर दखल घेऊन या मायनिंग, चिरेखाणी, दगड खाणी, क्रशरवर कारवाई करू असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी विधानसभा संपर्क अध्यक्ष महेश परब, उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, सावंतवाडी विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, विजय बांदेकर, श्रीराम सावंत, राजन परब आधी पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

\