दुचाकी- रिक्षात धडक ; दोघे गंभीर जखमी…

280
2
Google search engine
Google search engine

कुंभारमाठ येथील घटना ; रिक्षेतील मुले सुदैवाने बचावली…

मालवण, ता. १० : कुंभारमाठ येथील जरीमरी उतारावर भरधाव येणाऱ्या दुचाकीने समोरून येणाऱ्या रिक्षेस धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांही दुचाकीस्वारांच्या पायाला गंभीर दुखापत झाली तर रिक्षाचालकाच्या हाताला दुखापत झाली. सुदैवाने रिक्षामधील दोन लहान मुले बचावली. जखमींना शासकीय रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात सायंकाळी घडला.
मालवण-कसाल राज्यमार्गावरील कुंभारमाठ जरीमरी येथील उतारावरील अपघाती वळणावर मालवणहून कट्ट्याच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षेला कुंभारमाठहून मालवणच्या दिशेने येणाऱ्या भरधाव दुचाकीने विरुद्ध दिशेने येत समोरून धडक दिली. या धडकेत रिक्षा रस्त्याच्या डाव्या बाजूला कलंडली. या अपघातात दुचाकीवरील दुचाकीस्वारासह पाठीमागे बसलेल्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून खासगी रुग्णालयात हलविले आहे. रिक्षा चालकाच्या हाताला दुखापत झाली.
अपघातातील रिक्षामधील प्रवासी सुदैवाने बचावले. त्यात दोघा बालकांचा समावेश होता. अपघातानंतर रिक्षातील प्रवाशांना खासगी वाहनातून पाठविण्यात आले. रिक्षा पेंडूर येथील असल्याचे समजते. अपघातात जखमी झालेले दुचाकीस्वार परप्रांतीय असल्याची माहिती मिळाली. सायंकाळी उशिराने तडजोडीने प्रकरण मिटविण्यात आले. अपघातस्थळी पोलिस दाखल झाले होते.