शिवकालीन ‘मोहरम ताजिया’ सण उत्साहात…

282
2
Google search engine
Google search engine
Google search engine

ताबूत मिरवणुकीत हिंदू- मुस्लिम बांधवांचा सहभाग ; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचे खास नियोजन…

मालवण, ता. १० : सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा मोहरम ताजिया या उत्सवाकडे पाहिले जाते. मालवणात मुस्लिम बांधवांच्या वतीने आज सायंकाळी मिरवणुकीसह प्रथेप्रमाणे मोहरम उत्सव साजरा झाला. किल्ले सिंधुदुर्ग आणि मालवणवासीयांच्या ऐक्याचे प्रतिक दर्शवणाऱ्या ‘मोहरम ताजियाकडे’ शिवकालीन उत्सव म्हणूनही बघितले जाते. मालवण बाजारपेठ-भरड-ते राजकोट अशी ढोल ताशांसह ताबूत ताजिया मिरवणूक पार पडली.
किल्ले सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांकडे किल्ल्याच्या रक्षणासाठी असलेले किल्लेदार मुस्लिम बांधव होते. त्यापासून हिंदू व मुस्लीम धर्मात सर्वधर्म समभावाचे प्रतिक असणारा मोहरम ताजिया उत्सव शिवरायांनी मालवणात सुरु केला. आज ३५४ वर्षे लोटली तरी शिवकालीन प्रथा आजही हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने साजरी केली जात आहे.
मोहरम म्हणजे हजरत, मोहम्मद पैगंबर, हजरत अली (रजी), हजरत, फातिम (रजी), इमाम हुसेन, हजरत इमाम हुसेन या पाच पवित्र आत्म्यांचे प्रतिक म्हजेच ताबूत मानले जाते. किल्ले सिंधुदुर्ग येथील मुस्लिम-हिंदू बांधव एकत्र येत आज दुपारी १ वाजता शिवराजेश्वर मंदिरात ताबूत आणण्यात आले. शिवराजेश्वर मंदिरात प्रार्थना झाल्यानंतर मंदिरासभोवताली ताबूत मिरवणूक झाली. त्यानंतर होडीच्या सहाय्याने शहरातील मेढा पिराची भाटी येथे ताबूत आणण्यात आले. येथे आणखी एक ताबूत सजवून मालवण मेढा बाजारपेठ भरड मार्गे फोवकांडा पिंपळ ते मेढा राजकोट अशी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीतील ताबूत आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता. मिरवणुकीत मालवणातील हिंदू- मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मेढा राजकोट समुद्र किनारी या ताजीयाचे सायंकाळी विसर्जन करण्यात आले. यावेळी मालवण पोलिसांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकदिशा मार्गाने दुहेरी वाहतूक सुरु ठेवली होती.

\