सिंधुदुर्गातील तिन्ही जागा बसपा स्वबळावर लढणार…

2

पी. के. चौकेकर ; १६ ते २० सप्टेंबर या काळात होणार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती…

मालवण, ता. ११ : सिंधुदुर्गातील विधानसभेच्या तिन्ही जागा बहुजन समाज पार्टी स्वबळावर लढणार आहे. याबाबतचा निर्णय पक्षाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे अशी माहिती नाशिक झोन प्रभारी पी. के. चौकेकर यांनी दिली.
ऑक्टोबर २०१९ मध्ये होणार्‍या राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बहुजन समाज पार्टीची राज्यस्तरीय महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत झाली. या बैठकीत केंद्रीय महासचिव राज्याचे प्रमुख प्रभारी आमदार रामअचल राजभर, राज्य प्रभारी खासदार डॉ. अशोक सिद्धार्थ, प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे आदी उपस्थित होते.
बहुजन समाज पार्टी देशातील तीन नंबरचा राष्ट्रीय पक्ष आहे. आज पक्षाचे लोकसभेत १० खासदार तर राज्यसभेत ५ खासदार आहेत. देशातील सर्व राज्यामध्ये पक्ष कार्यरत आहे. तरीही राज्यातील आंबेडकरवादी समविचारी पक्षांसोबत युतीसाठी प्रयत्न करूनही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने राज्यातील सर्वच्या सर्व २८८ जागा स्वबळावर लढविण्याचे या बैठकीत जाहीर करण्यात आले. त्यानुसार बसपा सिंधुदुर्गची बैठक नाशिक झोन प्रभारी पी. के. चौकेकर यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत जिल्हा प्रभारी सुधाकर माणगावकर, रवींद्र कसालकर, अध्यक्ष दीपक जाधव, एस. एस. विणकर, जिल्हा महासचिव विजय साळकर, विधानसभा पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील तिन्ही जागांवर उमेदवार उभे करण्याचे ठरविण्यात आले. मुंबई, कोकण विभागातील जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती १६ ते २० सप्टेंबर या कालावधीत पक्षाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात घेण्यात येणार आहेत अशी माहितीही श्री. चौकेकर यांनी दिली.

0

4