आमदार नीतेश राणेंनी कणकवली नगराध्यक्षांचा राजीनामा घ्यावा

261
2
Google search engine
Google search engine

भाजप नगरसेवकांची मागणी:मुख्याधिकारी दबावाखाली असल्याचा आरोप

कणकवली, ता.११:कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना न्यायालयाने सात वर्षे सक्तमजूरीची शिक्षा सुनावली आहे. कणकवली शहरवासीयांसाठी ही लाजीरवाणी बाब आहे. वस्तुतः शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच कणकवली नगराध्यक्षांनी राजीनामा द्यायला हवा होता. मात्र त्यांनी राजीनामा न दिल्याने आता कणकवलीची जबाबदारी घेतलेल्या आमदार नीतेश राणेंनी नलावडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपचे नगरसेवक कन्हैया पारकर आणि रूपेश नार्वेकर यांनी आज केली. तसेच नगराध्यक्ष अपात्रतेचा प्रस्ताव मुख्याधिकार्‍यांनी तातडीने जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवायला हवा. पण ते कुणाच्या तरी दबावाखाली काम करत आहेत. त्यामुळे आम्ही नगराध्यक्ष अपात्रतेबाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले असल्याचीही माहिती श्री.पारकर, श्री.नार्वेकर यांनी दिली.
येथील भाजप कार्यालयात भाजप नगरसेवक कन्हैया पारकर, नगरसेवक रूपेश नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी महेश सावंत, प्रसाद अंधारी आदी उपस्थित होते.
श्री.पारकर म्हणाले, दोन वर्षे पेक्षा अधिक शिक्षा सुनावलेल्या कुठल्याही व्यक्तीला संवैधानिक पदावर राहता येत नाही. त्यामुळे नैतिकता स्वीकारून समीर नलावडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा तातडीने द्यायला हवा. मात्र तसे न झाल्याने गेले सहा दिवस कणकवली शहर नगराध्यक्षविना आहे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत आमदार नीतेश राणे यांनी माझ्यावर विश्‍वास ठेवून मतदान करा असे आवाहन कणकवलीकरांना केले होते. त्यानुसार त्यांच्यावर विश्‍वास ठेवून जनतेने नगरपंचायत त्यांच्या हाती दिली. आता नगराध्यक्ष कारागृहात गेल्याने त्यांनी नलावडेंकडून नगराध्यक्ष पदाचा राजीनामा घ्यायला हवे. तसे होत नसेल तर आमदार राणेंनी नैतिकता स्वीकारून आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा.
श्री.पारकर म्हणाले, नलावडेंचे कृत्य समाज विघातक आहे. यंदाच्या वर्षी ते तीन वेळा तुरुंगात गेले आहेत. पहिला राडा त्यांनी संदेश पारकर यांच्या घरासमोर केला होता. त्यानंतर चिखलफेक आंदोलन आणि आता वेंगुर्ले राडा प्रकरणी ते तुरुंगात आहेत. अशा समाजविघातक प्रवृत्ती असलेल्या नगराध्यक्षांच्या पक्षाला मुख्यमंत्री भाजपमध्ये विलीन करून घेणार नाहीत असेही श्री.पारकर म्हणाले. तसेच मुख्याधिकार्‍यांनी लवकरात लवकर नगराध्यक्षांच्या अपात्रतेचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवावा. यात कुणाचाही दबाव त्यांनी सहन करू नये.