नितेश राणेंचा टोला:साळगावकरांचे वक्तव्य म्हणजे आरोप नव्हेत तर वास्तव….
कणकवली, ता.११:सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांनी केसरकरांच्या बंगाली जादूबाबत केलेले वक्तव्य हे आरोप नव्हे तर वास्तव आहे. साळगावकर हे केसरकरांच्या अगदी जवळचे होते. त्यांच्याबद्दल त्यांना खडान्खडा माहिती आहे. त्यामुळे साळगावंकरांच्या वक्तव्याबाबत बोलवता धनी कुणी वेगळा असण्याची शक्यता नाही. तसेच साळगावकर हे जबाबदार नागरिक आहेत. दुसर्याच्या सांगण्यावरून बोलणे हा त्यांचा स्वभाव नाही. तसेच पालकमंत्र्यांनी पाच वर्षात काय विकास केलाय हे देखील जनतेला माहिती आहे. त्यामुळे बंगाली जादूबाबत साळगावकरांच्या बोलण्यात निश्चित तथ्य आहे असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी केले.
येथील प्रहार भवन मध्ये ज्ञानसंगम स्पर्धा मार्गदर्शन केंद्राबाबतची माहिती श्री.राणे यांनी पत्रकारांना दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “श्री. साळगांवकर यांनी केसरकरांच्या व्यक्तीमत्वाबाबत जे सत्य आहे ते जनतेसमोर आणले असून जनतेने त्याचा बोध घ्यावा. खरा माणूस कसा आहे, त्यांचे व्यक्तीमत्व साळगांवकरांनी सांगितले. हा विषय राजकारणापलीकडचा आहे. अशी जादू जर होत असेल तर लोकशाहीवर कसा विश्वास ठेवावा. विकास कामे ही जादूटोण्याने होतील का, साळगांवकर हे लहान माणूस नाहीत ते नगराध्यक्ष आहे. त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यांचे स्वतःचे काही अंदाज आहेत. केसरकरांचा साळगांवकर यांच्यासारखा वारसदार का सोडून जातो. जवळचा माणूस अविश्वास का दाखवतो हे देखील केसरकरांनी समजून घेण्याची गरज आहे.
मुख्यमंत्र्यांचे कणकवलीत स्वागत करणार
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १७ रोजी माझ्या मतदार संघात येत आहेत. त्यांचे आम्ही कणकवलीत स्वागत करणार आहोत. ते विकासाबाबत जनतेशी ते संवाद साधणार आहेत. त्याचा आपणास आनंद आहे असेही श्री.राणे म्हणाले.