आदित्य ठाकरेंचे उद्या सिंधुदुर्गात जल्लोषी स्वागत…

2

रूण दुधवडकर; वेंगुर्ले, कुडाळ,कणकवलीत साधणार संवाद…

कणकवली, ता.१३: शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे उद्या (ता.14) जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने सिंधुदुर्गात येत आहेत.त्यांचे युवासैनिक आणि शिवसैनिकांच्यावतीने जल्लोषी स्वागत होणार आहे.वेंगुर्ले, कुडाळ आणि कणकवलीत ते शिवसैनिकांशी तसेच नागरिकांशी संवाद साधणार आहेत.अशी माहिती शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी आज येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात दिली.
सिंधुदुर्गातील तीनही जागा स्वबळावर लढविण्यासाठी शिवसेना सक्षम आहे.तेवढे तगडे उमेदवारही देखील आहेत.मात्र याबाबतचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील अशीही माहिती श्री.दुधवडकर यांनी दिली.
येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात श्री.दुधवडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौर्‍याची माहिती दिली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, जिल्हा महिला संघटक नीलम सावंत-पालव, अ‍ॅड.हर्षद गावडे, गीतेश कडू, राजू राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
श्री.दुधवडकर म्हणाले, गोवा येथून आदित्य ठाकरे सिंधुदुर्गात येणार आहेत. यात सकाळी 10.30 वाजता त्यांचे वेंगुर्ले येथे स्वागत होईल. तेथे ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी एक वाजता कुडाळ येथे स्वागत होईल. तेथील महालक्ष्मी सभागृहात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 3.30 वाजता आदित्य ठाकरे कणकवलीत येतील. येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात त्यांचे स्वागत होईल. तर मुख्य पटवर्धन चौकात त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. या दौर्‍यात पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राज्यस्तरीय नेते देखील उपस्थित राहणार आहेत.
सावंतवाडी आणि कुडाळ मध्ये शिवसेनेचे विद्यमान तगडे उमेदवार आहेत. कणकवलीत देखील तीन तगडे उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक आहेत. पुढील काळात मातोश्रीवर त्यांच्या मुलाखती होतील. मात्र युती करून निवडणूक लढायची की स्वबळावर याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत. आम्ही सर्व 288 जागांवर लढण्याची तयारी केली आहे. या सर्व जागा केवळ स्वबळाची ताकद दाखविण्यासाठी नाहीत तर प्रत्येक मतदारसंघात आम्हाला पक्षसंघटनेचा विस्तार करायचा आहे असेही श्री.दुधवडकर म्हणाले.

9

4