बंडू हर्णे यांची पारकरांवर टीका ः नलावडेंवरील गुन्हे राजकीय स्वरूपाचे
कणकवली, ता.14 ः कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे हे नेहमीच पक्षासाठी आणि पक्षनेत्यांसाठी लढले. त्यांच्यावर राजकीय गुन्हे नोंदवले गेले. वेंगुर्ले राडा प्रकरणी त्यांना झालेल्या शिक्षेविरोधात आम्ही उच्च न्यायालयात अपील केले आहे. तेथे आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास आहे. पण ज्यांना जनतेने घरी बसवलंय. राजकीय राड्यावेळी, आंदोलनावेळी ज्यांनी नेहमीच पळ काढला, त्या पारकरांना नगराध्यक्षांचा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टीका स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक बंडू हर्णे यांनी आज केली.
येथील नगराध्यक्ष दालनात स्वाभिमान पक्षाच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बंडू हर्णे यांनी भाजप नगरसेवक कन्हैया पारकर यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला. यावेळी गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजित मुसळे, अॅड.विराज भोसले, कविता राणे, मेघा गांगण, उर्वी जाधव, अबिद नाईक, माजी नगरसेवक किशोर राणे आदी उपस्थित होते.
श्री.हर्णे म्हणाले, नगराध्यक्ष समीर नलावडे हे पक्षासाठी आणि नेत्यांसाठी नेहमीच पुढे होते. पक्षाच्या सर्व आंदोलनात त्यांनी झोकून दिले. त्यांच्यावर कधी वीज चोरी, बलात्कार, जुगार आदी गुन्हे दाखल झाले नाहीत. तर सर्व गुन्हे राजकीय स्वरूपाचे आहेत. वेगुर्ले राडा प्रकरणात त्यांनी उच्च न्यायालयात अपील केले आहे. त्यांना निश्चितच न्याय मिळेल. पण या शिक्षेचे भांडवल करून कन्हैया पारकर यांनी आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करू नये. त्यांचे बंधू पूर्वी कणकवलीचे सरपंच होते, नगराध्यक्ष होते. तर कन्हैया पारकर देखील उपनगराध्यक्ष होते. त्यांचा कार्यकाळ जनतेने पाहिला आणि त्यांनी घरी देखील पाठवले आहे. ज्यांना जनतेने नाकारले त्यांनी जनतेमधून निवडून आलेल्या नगराध्यक्षांचा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार गमवला आहे.
कणकवली नगरपंचायतीचे कामकाज उत्तम रितीने उपनगराध्यक्ष आणि आम्ही सर्व नगरसेवक सांभाळत आहोत. सर्व नागरिकांना सर्व दाखले वेळेवर मिळत आहेत. त्यामुळे दाखल्यांचीही चिंता कन्हैया पारकर यांनी करू नये. शहरातील एका व्यापार्याने पारकर यांची उधारी ठेवली होती. त्यावेळी कन्हैया पारकर आणि त्यांच्या दोन्ही बंधूनी त्या व्यापार्याच्या घरी जाऊन त्याला कंबरपट्ट्याने मारले होते. हा प्रकार त्यावेळी कणकवलीच्या प्रथम नागरिकांना किती शोभला होता हे देखील कणकवलीकर विसरलेले नाहीत असेही श्री.बंडू हर्णे म्हणाले.
राज्यात भाजपची सत्ता आहे. तर आम्ही विरोधात आहोत. त्यामुळे मुख्याधिकार्यांवर आम्ही दबाव आणण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. उलट सत्ताधारीच मुख्याधिकार्यांर दबाव आणू शकतात असेही श्री. हर्णे म्हणाले.