ऐन पावसात सावंतवाडीतील रस्ते पोखरणाऱ्यांना रोखण्याची गरज…  

464
2
Google search engine
Google search engine
Google search engine

प्रशासन सुस्त की आशीर्वाद; खड्डेमय रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यता…

सावंतवाडी/अमोल टेंबकर,ता.११: मोबाईल कंपनीच्या केबल घालण्यासाठी खाजगी कंपन्याकडून सावंतवाडी शहरातील तसेच परिसरातील रस्ते पोखरले जात आहेत. बांधकाम विभागाच्या कृपेमुळे ऐन पावसाळ्यातच हे काम सुरू आहे. याकडे लोकप्रतिनिधींचा दुर्लक्ष आहे. त्यामुळे अर्धवट खोदाई करून ठेवलेल्या रस्त्यात अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे याकडे तात्काळ गांभीर्याने लक्ष देऊन सुरू असलेले खोदाईचे काम रोखावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.

गेले काही दिवस सावंतवाडी शहरात एका खाजगी मोबाईल कंपनीच्या माध्यमातून केबल घालण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी थेट नव्याने करण्यात आलेले रस्ते खोदून त्या ठिकाणी केबल घालण्यात आल्या तर सद्यस्थितीत दुसऱ्या एका कंपनीकडून बोअरींग करून केबल घातली जात आहे. मात्र या परिस्थितीत सावंतवाडी शहरात नव्याने करण्यात आलेले रस्ते उखडून टाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्या ठिकाणी नव्याने करण्यात आल्यानंतर रस्ते उखडून टाकण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणी काम झाल्यानंतर रस्ते सुस्थितीत केले नसल्यामुळे त्या खड्ड्यात पावसात पाणी साचून रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या वाढणार आहे. तर दुसरीकडे चुकीच्या पद्धतीने खोदाई करण्यात आल्यामुळे शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईन अनेक ठिकाणी तुटल्याचे पुढे आले आहे.

याबाबत सावंतवाडीचे माजी नगरसेवक विलास जाधव यांनी आवाज उठवला होता. तसेच पावसाच्या तोंडावर सुरू असलेले हे काम तात्काळ बंद करावे, अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु त्यांच्या व नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत संबंधित कंपन्यांकडून आम्हाला बांधकाम विभागाने परवानगी दिली आहे, असे सांगून खोदाईचे काम सुरूच आहे. सद्यस्थितीत बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तलावाच्या काठी हे काम सुरू आहे तर यापूर्वी शिरोडा नाका परिसर, मळगाव घाटी, बेळगाव-वेंगुर्ला रस्ता, बांद्याकडे जाणार रस्ता अशा मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर अनेक ठिकाणी खोदाई करण्यात आली. मुख्य म्हणजे खोदाई झाल्यानंतर रस्ते तशाच अवस्थेत ठेवण्यात आले आहेत. काही ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. परंतु त्या ठिकाणी घालण्यात आलेली माती, दगड खाली बसून आणखी खड्डे पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत आम्ही कोणालाही परवानगी दिली नाही, असे सांगून पालिका प्रशासनाने हातवर केले आहेत. या सर्व परिस्थितीत संबंधित मोबाईल कंपन्या केबलसाठी सावंतवाडी मात्र पोखरत आहेत. त्या ठिकाणी हा प्रकार सुरू राहिल्यास पाईप लाईन सोबत रस्ते धोकादायक होणार आहेत. अनेक ठिकाणी अपघात होणार आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर सुरू असलेले काम रोखण्यासाठी पालिका प्रशासन किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग नेमकी काय भूमिका घेतो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

\