फाटलेली जाळी दाखवून मुख्यमंत्री, ठाकरे यांचे लक्ष वेधणार…

2

पारंपरिक मच्छीमारांचे शिष्टमंडळ आदित्य ठाकरेंना भेटणार ; मालंडकर – पराडकर यांची माहिती…

मालवण, ता. १३ : मत्स्यदुष्काळाच्या झळा सोसणार्‍या रापण व गिलनेटधारक पारंपरिक मच्छीमारांच्या तोंडचा घास परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स पळवत आहेत. यात भर म्हणून सध्या या ट्रॉलर्सनी मच्छीमारांची जाळे तोडून नेण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे उद्या जिल्हा दौऱ्यावर येणाऱ्या शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांची कुडाळ येथे भेट घेऊन त्यांना ही फाटलेली जाळी दाखवत पारंपरिक मच्छीमारांवर वर्षानुवर्षे होत असलेल्या अन्यायाकडे लक्ष वेधले जाणार आहे. त्याचप्रमाणे १७ सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन त्यांना फाटलेले जाळे दाखविले जाणार आहे अशी माहिती मिथुन मालंडकर व महेंद्र पराडकर यांनी दिली.
परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सनी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर अक्षरश: धुडगूस घातला आहे. त्यांनी पारंपरिक मच्छीमारांचे जगणे मुश्कील केले आहे. अगोदरच स्थानिक मच्छीमारांना मत्स्यदुष्काळाची समस्या भेडसावत असताना परराज्यातील ट्रॉलर्स जाळ्यांची नुकसानी करून ’दुष्काळात तेरावा महिना’ सुरू करत आहेत. त्यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडला आहे. तळाशील येथील बल्यावधारक मच्छीमार दशरथ कोचरेकर यांची गिलनेट पद्धतीची जाळी परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सनी तोडून नेली. यात मच्छीमारांचे सुमारे सव्वा लाख रूपयांचे नुकसान झाले. आज मिथुन मालंडकर, महेंद्र पराडकर, भाऊ मोरजे यांनी तळाशील येथे जाऊन जाळ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी दशरथ कोचरेकर, माजी सरपंच संजय केळुसकर व स्थानिक मच्छीमार उपस्थित होते.
परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स व पर्ससीनधारक महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसून अवैधरित्या मासेमारी करतात. एलईडीद्वारे बेकायदेशीरपणे पर्ससीन मासेमारी केली जात आहे. परंतु अशा विध्वंसकारी मासेमारीवर कडक कारवाई करून त्यांना रोखण्यात सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे. परिणामतः जिल्ह्यातील रापण व गिलनेटधारक पारंपरिक मच्छीमारांबरोबरच ट्रॉलर व्यावसायिकांवर मत्स्यदुष्काळाचे संकट ओढवले आहे ही वस्तुस्थिती श्री. ठाकरे यांच्यासमोर मांडली जाणार आहे. शासनाकडून मत्स्यदुष्काळाकडे होत असलेल्या दुर्लक्षाबद्दलही लक्ष वेधले जाणार असल्याचे श्री. मालंडकर व श्री. पराडकर यांनी सांगितले.
बेकायदेशीर एलईडी पर्ससीन आणि हायस्पीड ट्रॉलर्सच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमार आर्थिक संकटात सापडला आहे. त्याचबरोबर स्वतःच्या जीवावर उदार होऊन त्यांना आपला व्यवसाय करावा लागत आहे. ९ वावापासून पुढे परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सचा ताफा असतो. त्यांच्यापुढे जाळी समुद्रात जाळी मारणे मुश्कील झाले आहे. जाळ्यांचे नुकसान झाले तर नुकसान भरपाईचीही तरतूद नाही. मग मच्छीमारांना किनार्‍यालगतची धोकादायक खडके आणि महाकाय लाटांजवळ मासेमारी करावी लागत असून यामुळे दुर्घटना घडत आहेत. स्वतःच्या हक्काच्याच समुद्रात स्थानिक मच्छीमारांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली असल्याचे ठाकरेंच्या निदर्शनास आणून दिले जाईल, असे मालंडकर-पराडकर यांनी सांगितले.

4

4