राजेंचं ठरलं….राणेंचं काय…?

2

सावंतवाडी/अमोल टेंबकर, ता.१३:
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देशातल्या सर्वात बलशाली ठरलेल्या भाजपात जोरदार “इनकमिंग” सुरू आहे.यात मेगाभरती या गोंडस नावाखाली अनेक बलाढ्य नेत्यांचे जोरदार प्रवेश सुरू असतानाच गेले अनेक दिवस चर्चेत असलेले काही प्रवेश आता होत आहेत.यात साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले यांचा प्रवेश उदया होत आहे.मात्र सिंधुदुर्गाचे व पर्यायाने कोकणचे नेते म्हटले जाणाऱ्या नारायण राणे यांच्या प्रवेशाबाबत अद्याप पर्यंत “तारीख पे तारीख” सुरू आहे.त्यामुळे राणेंच नेमकं काय ठरलं असा प्रश्न मतदारसंघातून विचारला जात आहे.
दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी राणेंच्या भाजप प्रवेशाला जादूने खोडा घातला असा आरोप त्यांचे जवळचे सहकारी व आत्ताचे विरोधक बबन साळगावकर यांनी केल्यानंतर,पुन्हा एकदा हा मुद्दा राजकीय दृष्ट्या ऐरणीवर आला आहे.त्यामुळे गेले अनेक दिवस सुरू असलेल्या या चर्चेला पूर्ण विराम देण्यासाठी नेमकी कोणती भूमिका घेतली जाते,याकडे सगळ्यांचे लक्ष आहेत.
शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली,खरी परंतु त्यांना म्हणावे तसे राज्याच्या राजकारणात यश आलेले नाही.काही झाले तरी श्री.राणे यांचा आजही ही राज्याच्या राजकारणात तितकाच बोलबाला आहे.त्यामुळे त्यांच्यासारखा नेता सत्ताधारी पक्षात असावा असे अनेकांना वाटते,यातून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून सुद्धा वारंवार सकारात्मक मत व्यक्त केले जाते.मागच्या विधानसभेत राणे यांचा झालेला पराभव हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला ब्रेक लावणारा ठरला.ही वस्तुस्थिती आहे.आज कोट्यावधी रुपये जिल्ह्यात आले असतील,परंतु ते खर्च करण्यासाठी आवश्यक असलेली मानसिकता जिल्हा प्रशासनाकडे नाही,प्रशासनावर वचक ठेवण्यास पालकमंत्री कमी पडले,असे वारंवार विरोधकांकडून आरोप करण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नारायण राणे हवे आहेत त्यांनी सत्ताधारी पक्षात जावे अशी कार्यकर्त्यांची मागणी होती त्यानुसार नारायण राणे यांनी आपल्या दोन पुत्रांसह भाजपात प्रवेश करण्याची तयारी दाखवली होती.तसे त्यांनी बोलून दाखवले होते मागच्या 11 तारखेला त्याचा प्रवेश होता मात्र अनेक वेळा त्यांना प्रवेशाच्या तारखा देण्यात आल्या आहेत. आज ना उद्या राणे भाजपसारख्या पक्षात प्रवेश करतील असा कार्यकर्त्यांचा होरा आहे.साताऱ्याचे खासदार उदयनराजे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत अशीच चर्चा होती. आज त्यांनी आपला प्रवेश उद्या होणार आहे असे खुद्द ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले आहे त्यामुळे राणेंचा प्रवेश कधी होईल त्याचा मुहूर्त कोणता असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. येणाऱ्या 17 तारखेला जनाधार यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहे.त्यावेळी तरी किमान त्यांचा प्रवेश होईल व जिल्ह्याच्या राजकारणाला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे

2

4