अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला…

2

सिंधुदुर्गनगरी ता.१३: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपी अनिल बासू राठोड (२०) रा. वीजापुर कर्नाटक याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांनी दुसऱ्यांदा फेटाळून लावला आहे.सरकार पक्षातर्फे सरकारी वकील रूपेश देसाई यांनी काम पाहिले.
संशयित आरोपी अनिल राठोड याने १ सप्टेंबर २०१८ ते २० जून २०१९ या कालावधीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. तसेच त्याचे फोटो काढून ते प्रसारित केल्याप्रकरणी राठोड याच्यावर २५ जून २०१९ रोजी विजयदुर्ग पोलीस ठाण्यात भादवी कलम ३७६ (२)(j), ३५४, २९२, ४१७, ५०६, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम ४ (११-५)/१२ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६-ई, ६७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार राठोड ला २७ जून २०१९ रोजी अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालय हजर केले असता न्यायालयाने प्रथम पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडी मिळताच त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. तो नामंजूर करण्यात आला होता. दरम्यान दोषरोपपत्र दाखल झाल्यानंतर राठोड याने आपल्या वकिलांमार्फत न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

13

4