नारायण राणेंचा शब्द; सेवाशक्ती एसटी कर्मचारी संघटनेने वेधले लक्ष…
कुडाळ,ता.१६: विजापूर येथील डेपोत झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या “त्या” एसटीच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणार, असा विश्वास खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. सेवाशक्ती संघर्ष एस.टी कर्मचारी, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी खासदार राणे यांच्याकडे करण्यात आली होती. यावेळी त्यांनी हा शब्द दिला.
कुडाळ-विजापूर एस.टी बस घेऊन गेलेल्या चालक रमेश मांजरेकर व वाहक सचिन रावले यांना विजापूर आगारातील भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसने विजापूर आगारात जोरदार धडक दिली. त्यामध्ये कुडाळ आगारातील दोन्ही कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यातील रमेश मांजरेकर या चालकाचा पाय काढण्यात आला. या अपघातातील जखमी कर्मचाऱ्यांना भविष्यात परिवहन महामंडळाकडून नोकरी बाबतची हमी मिळावी तसेच ज्या विजापूर आगाराच्या कर्मचाऱ्यांमुळे हा अपघात झाला त्यांची चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी सेवाशक्ती संघर्ष एस.टी कर्मचारी, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे सिंधुदुर्ग विभागीय उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर, कुडाळ आगार अध्यक्ष दादा साईल, विभागीय सरचिटणीस रोशन तेंडोलकर, विभागीय प्रसिद्ध प्रमुख मिथुन बांबुळकर तसेच कुडाळ आगारातील कर्मचारी एम.एन. आंबेडकर, निलेश वारंग, तावडे, साई पारकर यांनी श्री. राणे यांच्याकडे केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सरचिटणीस रणजीत देसाई, डॉ. मिलिंद कुलकर्णी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, संदीप कुडतडकर आदी उपस्थित होते.