हायस्पीड ट्रॉलर्सकडून मच्छीमारांच्या जाळ्यांची तोड सुरूच…

164
2
Google search engine
Google search engine

सर्जेकोटमधील किरण आचरेकर यांच्या जाळ्या तोडल्याने अडीच लाखाचे नुकसान ; मच्छीमारांमध्ये संताप…

मालवण, ता. १४ : तळाशीलमधील दशरथ कोचरेकर यांच्या पाठोपाठ सर्जेकोट येथील किरण चंद्रकांत आचरेकर यांची गिलनेट पद्धतीची जाळी परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सनी तोडल्याची घटना मध्यरात्री घडली. यात केवळ त्यांची दोनच जाळी मिळाली असून उर्वरित २३ जाळी हायस्पीड ट्रॉलर्सनी तोडल्याने समुद्रात वाहून गेली. यात आचरेकर यांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सिंधुदुर्गच्या सागरी हद्दीत सध्या हायस्पीड ट्रॉलर्सधारकांनी धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्यावेळी स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी समुद्रात टाकलेल्या गिलनेटच्या जाळ्या या हायस्पीड ट्रॉलर्सधारकांकडून तोडल्या जात आहेत. यात पारंपरिक मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. एकीकडे मत्स्यदुष्काळाची समस्या भेडसावत असताना दुसरीकडे मच्छीमारांच्या जाळ्या तोडून टाकल्या जात असल्याने मच्छीमारांसमोरील संकटात वाढ झाली आहे.
काही दिवसापूर्वी तळाशील येथील दशरथ कोचरेकर यांच्या जाळ्यांचे हायस्पीड ट्रॉलर्सधारकांनी नुकसान केले होते. आता काल मध्यरात्री सर्जेकोट येथील किरण आचरेकर यांनी समुद्रात मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यांचे हायस्पीड ट्रॉलर्सनी नुकसान केल्याचे दिसून आले. जाळ्या तोडल्याने सुमारे २३ हुन अधिक जाळ्या समुद्रात वाहून गेल्या. यात केवळ दोनच जाळ्या सापडल्या. जाळ्या वाहून गेल्याने आचरेकर यांचे सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. समुद्रात वाहून गेलेल्या जाळ्यासाठी मच्छीमारांनी शोधमोहीम राबविली आहे.