वेंगुर्ले.ता,१४: शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या वेंगुर्ले येथील पाटकर हायस्कूलच्या ‘मैत्री ८९‘ ग्रुपतर्फे वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी-सुरंगपाणी या केंद्रशाळेला डिजिटल स्मार्ट टीव्ही तसेच गरजू मुलांना स्कूल बॅग व गणवेशाचे वाटप करण्यात आले.
येथील रा. कृ. पाटकर हायस्कूलचा ‘मैत्री ८९‘ हा ग्रुप गेली २ वर्षे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करीत आहे. या ग्रुपतर्फे अलिकडेच वेंगुर्ला शहरातील गरजू मुलांना, शिरोडा येथील मतिमंद शाळेतील मुलांना तसेच वेंगुर्ला नं. १ च्या मुलांना गणवेश व शैक्षणिक साहित्य वितरण, सावंतवाडी येथील कॅन्सर रुग्णालयाला उपयोगी साहित्य असे बरेच उपक्रम राबविले आहेत. तालुक्यातील वायंगणी-सुरंगपाणी या शाळेने या ग्रुपकडे शालेय उपयोगी साहित्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार आज वायंगणी-सुरंगपाणी या केंद्रशाळेला डिजिटल स्मार्ट टीव्ही तसेच शाळेतील ८ मुलांना स्कूल बॅग आणि गरजू मुलांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी ‘मैत्री ८९‘ ग्रुपच्या सदस्यांबरोबरच शाळेच्या मुख्याध्यापिका दिपा वेंगुर्लेकर, शिक्षक मनोज बहिरम, शामल मांजरेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रविण राजापूरकर, ग्रामपंचायत सदस्य रेश्मा मुणनकर, माता-पालक संघाच्या विद्या गोवेकर, मनीषा टेंबकर, ममता टेंबकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. ‘मैत्री ८९च्या‘ या दातृत्वाबद्दल शाळेतर्फे मुख्याध्यापिका वेंगुर्लेकर यांनी त्यांचे आभार मानले.