फोंडाघाट येथून महिला मैत्रीणीसह बेपत्ता

2

पित्याची कणकवली पोलिसांत तक्रार

कणकवली, ता:14 : तालुक्यातील फोंडाघाट येथून साक्षी संतोष राणे (वय 35) ही 3 सप्टेंबर पासून फोंडाघाट येथील एका मैत्रीणीसह बेपत्ता झाली आहे. याबाबतची तक्रार साक्षी हिचे वडील बबन सदाशिव परब (वय 70, रा.वरवडे, परबवाडी) यांनी आज येथील पोलिस ठाण्यात दिली.
साक्षी संतोष राणे (माहेरचे नाव सुनंदा बबन परब) हिचा विवाह 13 वर्षापूर्वी कणकवलीतील संतोष राणे यांच्याशी झाला होता. मात्र नवर्‍याशी पटत नसल्याने गेली 12 वर्षे ती माहेरी राहत होती. गेले काही महिने साक्षी ही फोंडाघाट येथील एका हॉटेलात कामाला जाते. तेथेच ती खोली घेऊन राहते तर अधूनमधून माहेरी येत असते. 2 सप्टेंबरला साक्षी ही वरवडे येथे आपल्या माहेरी आली होती. त्यानंतर 3 सप्टेंबरला ती फोंडाघाट येथे कामाला जाते असे सांगून घरातून निघून गेली. मात्र त्यानंतर तिचा मोबाईल बंद असल्याचे साक्षी हिचे वडील बबन परब यांच्या लक्षात आले. त्यांनी आपला मुलगा विनोद याच्यासह फोंडाघाट येथे जाऊन चौकशी केली. यावेळी साक्षी आणि तिची मैत्रीण सायली तांबे (फोंडाघाट, बौद्धवाडी) या दोघांचेही मोबाईल बंद असल्याचे लक्षात आले. तसेच या दोघीही फोंडाघाट परिसरात तसेच नातेवाइकांकडे देखील आढळून आल्या नाहीत. त्यामुळे साक्षी राणे बेपत्ता असल्याची फिर्याद तिचे वडील बबन परब यांनी आज येथील पोलिस ठाण्यात दिली. साक्षी राणे हिची उंची 5 फुट, रंग सावळा, अंगाने सडपातळ, अंगात पंजाबी ड्रेस, गळ्यात मंगळसूत्र असा पेहेराव आहे.

18

4