भरपाई पासून वंचित राहू नये म्हणून खुद्द तहसिलदार वृध्दाच्या दारात…

283
2
Google search engine
Google search engine

कुडाळ तहसिलदारांची माणूसकी; शेतकर्‍यांना बांधावर सेवा देण्याची तयारी…

कुडाळ/निलेश जोशी,ता.२४: अधिकारी म्हटला की तो प्रशासकीय कामाशी संबंध ठेवतो. मात्र आपण सुध्दा समाजाचे काही तरी देणे लागतो ही जाणीव ठेवून एक सच्चा अधिकारी असल्याचा आदर्श कुडाळ तहसिलदार विरसिंग वसावे यांनी घालून दिला आहे. एका वृध्द व्यक्तिला चालता येत नव्हते. केवायसी अभावी नुकसान भरपाई मिळणार नव्हती हे समजल्यानंतर वसावे यांनी थेट त्यांचा घरी जावून त्यांनी ही प्रक्रिया पुर्ण केली आहे. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या बांधावर आपली यंत्रणा पाठवून तेथील शेतकऱ्यांना ही सेवा देण्याचे त्यांनी मान्य केले आहे.

कुडाळ तालुक्यात सन २०२२-२३ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या भातशेतीची सुमारे ३० लाख ६२ हजार ३३ रूपये नुकसान भरपाई मंजूर आहे. ती रक्कम लाभार्थींच्या खात्यावर जमा व्हावी, यासाठी त्या-त्या लाभार्थ्यांची ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे. कुडाळ तालुक्यात १ हजार २८२ नुकसानग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे. शासनाने याबाबत वारंवार आवाहन केले होते, त्या आवाहनानंतर सुध्दा तालुक्यात अजुनही ९१ लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी झाली नव्हती, त्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई रक्कम शासनाच्या खात्यात पडुन होती. याची दखल घेत कुडाळ तहसील वीरसिंग वसावे यांनी पुढाकार घेत कोणत्याही परिस्थितीत आपल्या तालुक्यातील एकही शेतकरी नुकसानग्रस्त निधीपासून वंचित राहू नये यासाठी कुडाळ पावशी येथे खास शिबिराचे आयोजन केले होते. यासाठी पावशीतील वाडीवरील ई-केवायसी न केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना शिबिर ठिकाणी आणण्यासाठी व नेवून सोडण्यासाठी आपल्या शासकीय गाडीने व्यवस्था केली. काही शेतकऱ्यांना शेताच्या बांधावरुन शिबिर ठिकाणी आणत एकुण १२ शेतकऱ्यांची ई-केवायसी करून घेतली.

कुडाळ तहसिलदार श्री. वसावे यांनी पावशी येथील शिबिर ठिकाणी भेट दिली व परिपूर्ण माहिती घेतली. यावेळी काही लाभार्थी आले नाहीत असे उपस्थित तलाठी व कोतवाल यांनी सांगितले. लाभार्थी शेतकरी ई-केवायसी साठी का आले नाहीत? त्यांची काय अडचण आहे? आपण त्यांच्या घरी जावून येवू, असे सांगत स्वतः तहसिलदार श्री. वसावे आपल्या गाडीने पावशी बेलनदि येथील वयोवृद्ध सद्गुरू तेंडोलकर यांच्या घरी जाण्यासाठी गेले मात्र रस्ता अडचणींचा असल्याने अर्ध्यावर गाडी थांबवून चालत अंथरूणावर असलेले वृध्द श्री. तेडोंलकर यांच्या घरी पोहोचले, अशा स्थितीत ह्या व्यक्ती केंद्रापर्यंत येणं शक्य नाही याची खात्री झाल्यावर आपल्या यंत्रणेला घरी जावून ई-केवायसी पुर्ण करुन घेण्याचे आदेश त्यांनी दिले. तहसिलदार श्री. वसावे यांच्या या कृतीचे स्थानिक नागरिकांनी खास कौतुक केले. खऱ्या अर्थाने शासन नव्हे तर शासकीय अधिकारीच गोरगरीब जनतेच्या दारी असे चित्र कुडाळ तालुक्यात दिसू लागले आहे. लाभार्थ्यांच नुकसान होऊन नये म्हणून जेव्हा एखादा शासकीय आधिकारी रविवारची सुट्टी असून सुद्धा वाट वाकडी करून लाभार्थ्यांच्या घरापर्यंत चालत जाऊन लाभ मिळवून देतो. त्यावेळी माणुसकी आणि संवेदनशीलता अजूनही शासकीय अधिकाऱ्यांमध्ये जिवंत आहे याचा प्रत्यय येतो.