तपासणीअंती बॉम्बनाशक पथकाकडून तो सिलिंडर नष्ट…
आचरा, ता. १४ : मुणगे केवुंडले बेटावर काल आढळलेल्या सिलिंडर सदृश्य वस्तूची आज बॉम्बनाशक पथकाने तपासणी केली. त्यानंतर त्या सिलिंडरचा स्फोट करून नष्ट करण्यात आला.
देवगड तालुक्यातील मुणगे आडबंदर येथील केवूंडले बेटावर काल आचरा समुद्रात बुडालेल्या युवकांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या आचरा जामडूल येथील प्रमोद वाडेकर, भाग्येश वाडेकर यांना चार फूट लांबीचा सिलिंडर सदृश्य वस्तू आढळून आली होती.
सिलिंडर सदृश्य वस्तू अंदाजे चार फूट लांबीची असून गंजलेल्या स्थितीत असल्याचे वाडेकर यांना दिसून आले. स्फोट होण्याचा धोका ओळखून त्यांनी देवगड पोलिस ठाण्यास खबर दिली होती. काल देवगड पोलिसांनी या वस्तूची पाहणी केल्यावर बॉम्बनाशक पथकाला पाचारण करण्यात आले होते. आज आलेल्या बॉम्बशोधक व नाशक पथकाने या सिलिंडर सदृश्य वस्तूंची तपासणी केली. हेडकाॅन्स्टेबल संजय साटम यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झालेल्या या पथकात लक्ष्मण तवटे, सिद्धार्थ प्रभूतेंडोलकर, श्वान हस्तक, समिर कोचरेकर श्वान शेरा आदी सहभागी झाले होते. तपासणीत बोटीवर वापरण्यात येणारा सिलिंडर असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सिलेंडरचा स्फोट घडवून तो नष्ट करण्यात आला.