बांगीवाडा समाजमंदीरच्या कुंपणावर आक्षेपार्ह उल्लेख ; स्थानिक नागरिक संतप्त…

2

नगराध्यक्ष, नगरसेवकांची मध्यस्थी ; आक्षेपार्ह उल्लेख हटविला…

मालवण, ता. १४ : शहरातील बांगीवाडा येथील समाजमंदिर समोरील दगडी कुंपणावर आक्षेपार्ह उल्लेख दाखविला गेल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेत चांगलेच फैलावर घेण्यात आले. अखेर नगराध्यक्ष व स्थानिक नगरसेवक यांच्या उपस्थितीत केलेला उल्लेख हटविण्यात आला. या प्रकरणी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी माफी मागितल्यावर या प्रकरणावर पडदा पडला.
यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक यतीन खोत, बसपाचे नाशिक झोन प्रभारी पी. के. चौकेकर, सिद्धार्थ जाधव, पालिका कर्मचारी वसाहतीतील स्थानिक नागरिक उपस्थित होते.
समाजमंदिर समोरील दगडी कुंपणावर आक्षेपार्ह उल्लेख तसेच त्या दिशेकडे जाणारा मार्ग असा उल्लेख केल्याचे दिसून आले. हे काम करताना पालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना सांगूनही त्यांनी उल्लेख केल्याने स्थानिक नागरिक संतप्त बनले. पालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेत चांगलेच सुनावण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष कांदळगावकर, श्री. खोत तसेच अन्य पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नगराध्यक्षांनी स्थानिकांच्या भावना लक्षात घेत संबंधित अधिकाऱ्याला खडे बोल सुनावले. तत्काळ तो उल्लेख हटविण्यास सांगितले. त्यानुसार कुंपणावरील आक्षेपार्ह उल्लेख हटविण्यात आला. नगराध्यक्ष, स्थानिक नगरसेवक आल्यानेच आम्ही हे प्रकरण वाढवीत नसल्याचे श्री. चौकेकर यांनी सांगितले. अखेर त्या अधिकाऱ्याने माफी मगितल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.

2

4