मला साथ द्या, कडक कारवाई करतो…

2

मत्स्य अधिकारी प्रदीप वस्त यांचे मच्छीमारांना आवाहन…

मालवण, ता. १५ : भर समुद्रात परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सना पकडणे फार जोखमीचे काम असते. हायस्पीड ट्रॉलर्सपुढे मत्स्य विभागाच्या एकट्या गस्तीचा टीकाव लागत नाही. त्यांच्याकडून गस्ती नौकेला घेरण्याचाही प्रयत्न केला जातो. तरी स्थानिक मच्छीमारांनी स्वतःचे ट्रॉलर्स आमच्या सोबतीला द्यावेत. जेणेकरून आम्ही कडक कारवाई करू, असे आवाहन सहाय्यक मत्स्य आयुक्त प्रदीप वस्त यांनी मच्छीमारांना केले.
श्री. वस्त यांनी आज पारंपरिक मच्छीमारांना स्वतःहून चर्चेसाठी बोलाविले होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजिवी रापण संघाचे सचिव दिलीप घारे, मालवण तालुका श्रमिक मच्छीमार संघाचे मिथुन मालंडकर, भाऊ मोरजे, महेंद्र पराडकर, संतोष देसाई, नितीन परूळेकर आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मच्छीमारांनी मत्स्य विभागाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा संपर्क करावा. मात्र हायस्पीड ट्रॉलर्स आणि एलईडी पर्ससीनच्या बेकायदेशीर मासेमारी बंद झालीच पाहिजे, असे मच्छीमारांनी स्पष्ट केले. तसेच मत्स्य विभागाने पोलिसांकडून संरक्षण घ्यावे, असे आवाहन मच्छीमारांनी केले.

5

4