राज्य शासनाने मत्स्यदुष्काळ जाहीर करावा…

2

 

मोर्वे, तांबळडेगमधील मच्छीमार महिलांची मागणी ; पावसाळी अनुदान मिळायलाच हवे…

देवगड, ता. १६ : बेकायदेशीर एलईडी पर्ससीन आणि परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे रापण व गिलनेटधारक पारंपरिक मच्छीमारांना मत्स्यदुष्काळाची समस्या भेडसावत असून शासनाने तत्काळ मत्स्यदुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी तांबळडेग व मोर्वे येथील मच्छीमार महिलांच्या बैठकीत करण्यात आली.
चेन्नई येथे अॉगस्ट महिन्यात मच्छीमार महिलांसाठी राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोर्वे गावातील तेजस्विनी कोळंबकर यांनी प्रतिनिधित्व केले होते. या कार्यशाळेत मिळालेली ‘अन्न सुरक्षा व दारिद्रय निर्मूलनाच्या संदर्भात लघु मत्स्योद्योगांच्या संरक्षणासाठी ऐच्छिक मार्गदर्शक तत्वे’ याविषयीची माहिती देण्यासाठी तेजस्विनी कोळंबकर यांनी तांबळडेग येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीस दोन्ही गावांमधील मच्छीमार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी व्यवसाय बंद असतो. तसेच अवेळी पडणारा पाऊस आणि वादळी वारे यामुळेसुद्धा मत्स्य हंगाम बुडतो. त्यामुळे मच्छीमार बंधु व भगिनींना पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत अनुदान मिळायलाच हवे. तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये मच्छीमारांच्या मुलांना प्राधान्य मिळाले पाहिजे. त्यांना शैक्षणिक सोयी-सुविधाही उपलब्ध झाल्या पाहिजेत. ५८ वर्षांवरील मच्छीमार महिलांना पेन्शन योजना लागू झाली पाहिजे. हायस्पीड ट्रॉलिंग व एलईडी पर्ससीन मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांची अन्नसुरक्षा धोक्यात आलीय. त्यामुळे मत्स्यदुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. यावेळी संचिता कोयंडे, संजना मालंडकर, अनिता कुबल, शलाका कोयंडे, दिपीका कुबल, मनस्वी तारी, दिपाली धुरत, आनंदी येरागी, किर्ती गावकर,राधाबाई गावकर, कांचन सारंग, गीतांजली धावडे, प्रियांका ढोके, देवता कोळंबकर, सुमित्रा बापर्डेकर आदींसह ५० महिला उपस्थित होत्या. रश्मी कांदळगावकर यांनी आभार मानले.
मच्छीमार महिलांच्या मागण्यांसंदर्भात आमदार व खासदारांना लवकरच निवेदन देण्यात येणार आहे. त्यांच्यामार्फत शासनाकडे मागण्यांसंदर्भात पाठपुरावा केला जाईल. तसेच मच्छीमार महिलांची सहकारी संस्था उभारून राज्य व केंद्रीय स्तरावरील मच्छीमार महिलांच्या संघटनांशी संलग्न राहून कार्यरत राहणार असल्याचे तेजस्विनी कोळंबकर यांनी सांगितले.

3

4