नागवे जलस्वराज्य प्रकल्पाचे दप्तर हरवले

2

ग्रामपंचायत व पाणी पुरवठा विभागाचे कानावर हात

सिंधुदुर्गनगरी.ता,१६:कणकवली तालुक्यातील नागवे जलस्वराज्य प्रकल्पाचे दप्तर ग्राम पंचायत व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग या दोघांकडेही नाही. ग्राम पंचायत म्हणते आम्ही जलस्वराज्य कार्यालयाकडे जमा केले. तर ग्रामीण पाणी पुरवठा विभाग म्हणतो, आमच्याकडे दप्तर नाही. त्यामुळे सोमवारी झालेल्या स्थायी समिती सभेत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पुन्हा आपल्या कार्यालयात हे दप्तर आहे की नाही ? याची खात्री करावी, अशी सूचना सतीश सावंत यांनी केली.
जिल्हा परिषदेच्या बॅ नाथ पै सभागृहात उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती दुपारी संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजूलक्ष्मी, सचिव राजेंद्र पराडकर, विषय समिती सभापती जेरॉन फर्नांडिस, अंकुश जाधव, डॉ अनिशा दळवी, पल्लवी राऊळ, सदस्य रेश्मा सावंत, संजय पडते, संतोष साटविलकर, राजेंद्र म्हापसेकर यांच्यासह खातेप्रमुख व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी 100 च्या खाली पटसंख्या असणाऱ्या शाळांना 50 हजार रूपये तर 100 च्या वर पटसंख्या असणाऱ्या शाळांना 75 हजार रूपये अनुदान समग्र शिक्षा अभियानमधून मिळणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच स्वच्छ सर्व्हेकण अंतर्गत जिल्ह्यातील 24 गावांची तपासणी समितीने केली आहे. आता प्लॅस्टिकमुक्तसाठी अभियान राबविण्यात येत आहे. केंद्राच्या आयुष्यमान भारत अंतर्गत जिल्ह्यात एक लाख 40 हजार लाभार्थी असताना आतापर्यंत केवळ 42 हजार लाभार्थ्याना ई कार्डचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

जि.प.देणार पत्रकार पुरस्कार
जिल्हा परिषदेचे विविध उपक्रम वृत्तपत्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवीणाऱ्या पत्रकारांना जिल्हा परिषद स्वनिधीतून दरवर्षी ‘आदर्श पत्रकारिता’ पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नियमावली बनविण्यात येणार आहे. याकरिता एक समिती गठित करण्यात आली आहे. या समितीची एक बैठक झाली असून पुढील सभेला याची परिपूर्ण माहिती देण्यात येणार आहे, असे यावेळी रणजीत देसाई यांनी सांगितले.

14

4