सिंधुदुर्गातील मत्स्य विभागाच्या रिक्त पदांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती…

2

आमदार वैभव नाईक यांचे विशेष प्रयत्न…

मालवण, ता. १६ : गेली अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्य विभागाची पदे रिक्त होती. याबाबत आम. वैभव नाईक यांनी वारंवार विधानसभेत आवाज उठविला होता. तसेच मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन व वेळोवेळी निवेदने देऊन हि रिक्त पदे भरण्याबाबत पाठपुरावा केला होता. नवीन शासकीय भरतीमध्ये हि पदे भरण्याचे मत्स्य विकास मंत्र्यांनी मान्य केले होते. त्यानुसार नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या झालेल्या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेले आश्लेषा गोळवणकर – सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी, श्रुतिका गावडे – परवाना अधिकारी, मुरारी भालेकर – परवाना अधिकारी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोकण किनारपट्टीवर सागरी हद्दीत बंदी आदेश असूनही अवैधरित्या पर्ससीननेट एलईडी मच्छीमारी राजरोस सुरु आहे. यामुळे पारंपरिक मच्छीमारांवर अन्याय होत आहे. हायस्पीड ट्रॉलर्सकडून पारंपरिक मच्छीमारांची जाळी तोडली जात आहेत. मत्स्य विभागातील अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे या सर्वांवर कारवाई करणे कठीण होत होते. यावर कारवाई व्हावी, अनधिकृत मच्छीमारी बंद व्हावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मत्स्य विभागातील अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरणे आवश्यक असल्याचे आम. वैभव नाईक यांनी वारंवार मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांच्या निदर्शनास आणून दिले होते. आम. नाईक यांनी केलेल्या या प्रयत्नांना यश येऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहाय्यक मत्स्य विकास अधिकाऱ्यांची हि रिक्त पदे भरण्यात आली आहेत. यामुळे आता अनधिकृत मासेमारीवर कारवाई होऊन पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळणार आहे.

41

4