आंतरजिल्हा बदली शिक्षक सोडल्याने सभापतींसह सदस्य नाराज

2

नवीन शिक्षक मिळेपर्यंत उर्वरित शिक्षक न सोडण्याचा ठराव

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७६ प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली आहे. त्यांच्या जाग्यावर केवळ दोनच शिक्षक या बदलीत जिल्ह्याला मिळणार आहेत. या बदलीचे आदेश ९ सप्टेंबर रोजी प्राप्त झाले असताना ११ सप्टेंबर रोजी यातील ४ शिक्षक कार्यमुक्त करण्यात आले. मात्र, याची साधी पूर्वकल्पना शिक्षण सभापतींना देण्यात आली नाही. त्यामुळे सोमवारी झालेल्या शिक्षण समिती सभेत सभापती डॉ अनिशा दळवी यांच्यासह सभागृहाने तीव्र नाराजी व्यक्त करीत प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या कार्यपद्धती बाबतही नाखुशी व्यक्त करण्यात आली. यावेळी पर्यायी शिक्षक मिळेपर्यंत या बदलितील शिक्षक न सोडण्याचा ठराव घेण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या बॅ नाथ पै सभागृहात सभापती डॉ दळवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या तहकूब शिक्षण समिती सभेला सदस्य सतीश सावंत, सरोज परब, सुनील म्हापणकर, राजेंद्र म्हापसेकर, राजन मुळीक, संपदा देसाई, उन्नती धुरी यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
आंतरजिल्हा बदलीचे शिक्षक सोडल्याने सतीश सावंत यांनी, ‘सभापतींनाच माहिती नसेल तर कसे चालेल ?’ असा प्रश्न उपस्थित करीत ‘शिक्षक दया….अन्यथा शाळा बंद करण्याचे आदेश दया..केवळ नावाला शाळा सुरु ठेवू नका’ असा ठराव घेवून शासनाला पाठविण्याच्या सूचना केली. यावर सभापती डॉ सौ दळवी यांनीही ‘मी ९ सप्टेंबर रोजी कार्यालयात आली. पुन्हा ११ रोजी आली. या दोन दिवसात आंतरजिल्हा बदलीचे आदेश प्राप्त झाले. त्याबाबत १० रोजी चर्चा झाली. ११ रोजी त्यावर मी येण्यापूर्वी अंतिम स्वाक्षरी झाली. त्यानंतर केवळ ही प्रक्रिया आपल्याला सांगितली गेली, असे सांगत नाराजी व्यक्त केली. शिक्षणाधिकारी आंबोकर यांनी अध्यक्षा संजना सावंत यांच्या दालनात त्यांच्या समवेत उपाध्यक्ष रणजीत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजूलक्ष्मी व आपल्यात चर्चा होवून हजर झालेल्या ४ शिक्षकांच्या बदल्यात तेवढेच शिक्षक सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

जिल्ह्याला ८१ पदवीधर शिक्षक प्राप्त
नुकत्याच झालेल्या शिक्षक भरतीमधून जिल्ह्याला ८० पदवीधर शिक्षक व एक अनुकंपाखालील पदवीधर असे ८१ शिक्षक उपलब्ध झाले आहेत. शासन आदेशानुसार समानिकरणाचा निकष लावत देवगड ४३, वेंगुर्ले २७, मालवण ६ व दोडामार्ग ५ अशाप्रकारे या शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली आहे.

१०० पटांवरील ३८ शाळांसाथी विशेष प्रयत्न
जिल्ह्यात १०० किंवा त्यावरील पट असलेल्या ३८ शाळांमध्ये शाळा व शिक्षण दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या शाळांत विशेष भौतिक सुविधा देण्यासाठी शाळा इमारतीचे वेगळे टाइप प्लॅन तयार करण्याचे आदेश यावेळी बांधकाम विभागाला देण्यात आले. तसेच शिक्षण दर्जा सुधारण्यासाठी शिक्षक नियुक्तीचे वेगळे निकष लावावेत यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्याचे ठरले. बीएससी होवून नव्यानेच शिक्षक म्हणून रुजू झालेल्या शिक्षकांना या ठिकाणी नियुक्ती देण्याची गरज असल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले. महाराष्ट्रात जिल्हा परिषद शाळांचा वेगळा पॅटर्न तयार करण्याचे आवाहन यावेळी शिक्षण विभागला करण्यात आले.

जिल्ह्यात एक व दोन पटांच्या २०७ शाळा
जिल्ह्यात एकीकडे शिक्षकांची कमतरता असताना एक किंवा दोनच विद्यार्थी असलेल्या ४९ शाळा कार्यरत आहेत. यात एक पट असणारी २० तर २ पट असणाऱ्या २९ शाळा आहेत. ३ पटाच्या ४९, ४ पटाच्या ४८ व ५ पटाच्या ६१ शाळा आहेत. तसेच १ ते १० पटाच्या ४३६ शाळा आहेत. यात ६ पटाच्या ४९, ७ पटाच्या ४५, ८ पटाच्या ५३, ९ पटाच्या ३७ व १० पटांच्या ४५ शाळांचा समावेश आहे.

शाळांना घरघंटीच दया
शाळांना पोषण आहारात शासनाने नाचनी, बाजरी, ज्वारी हे धान्य २५ टक्के मंजूर केले आहे. मात्र, हे केवळ धान्य मिळणार आहे. ते दळून घ्यावे लागणार असल्याने आम्ही शासनाला हे शक्य नसल्याचे कलविले आहे. त्यावर सतीश सावंत यांनी, ‘आता शाळांना घरघंटीच दया. आमच्या शिक्षकांनी गिरणीवरुन धान्य दळून आणायचे का ? त्यांनी भाकऱ्या भाजायच्या का ?’ असा प्रश्न केला. यावेळी त्यांनी दुर्धर आजारासाठी शिक्षकांनी मेडिक्लेम केल्यास त्याची अडवणुक करू नका, अशा सूचना केल्या.

22

4