सी- वर्ल्डवर बोलण्याची आमदारांना नैतिकता नाही…

2

बाबा मोंडकर ; येत्या काळात सी-वर्ल्ड प्रकल्प मार्गी लागेल…

मालवण, ता. १६ : येथील पर्यटन विकासासाठी आमदार वैभव नाईक यांनी गेल्या पाच वर्षात म्हणावे तसे कोणतेही प्रयत्न केले नाहीत. यात आता सी-वर्ल्ड प्रकल्प होण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होत आहेत त्यामुळे या प्रकल्पावर बोलण्याची त्यांची नैतिकता नाही. पर्यटन, मच्छीमारांच्या विकासासाठी आतापर्यत भाजपच्या माध्यमातून जे प्रयत्न केले गेले त्यांना खो घालण्याचे काम आमदारांनी केले असा आरोप भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
हॉटेल महाराजा येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी धोंडी चिंदरकर, बबलू राऊत, अवि सामंत, श्री. गावडे आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्याचा कायापालट करणारा सी-वर्ल्ड प्रकल्प मार्गी लागावा यासाठी गेली पाच वर्षे भाजपच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. या प्रकल्पासाठी लागणारी आवश्यक ३५० एकर जागा उपलब्ध झाली आहे. जुलै महिन्यात मुंबई मंत्रालयात झालेल्या बैठकीत या प्रकल्पावर सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीस प्रदेश चिटणीस राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माधव भांडारी आदी उपस्थित होते. प्रकल्पास आणखी जागा लागल्यास ती देण्यास जमीनमालक तयार असल्याचे श्री. मोंडकर यांनी सांगितले.
सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत आमदारांनी वेगवेगळी स्टेटमेंट देत प्रकल्पाच्या संबंधित कंपनीने गाशा गुंडाळल्याचे म्हटले. या कंपनीला गाशा गुंडाळण्यास भाजपनेच प्रयत्न केले. पर्यटन व्यावसायिकांच्या विकासासाठी आमदारांनी बैठक घ्यायला हवी होती. मात्र त्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न झाले नाहीत. उलट पर्यटन प्रकल्पांकडे दुर्लक्ष करण्याबरोबर भाजपकडून होत असलेल्या प्रयत्नांना खो घालण्याचे काम त्यांनी केले. जिल्ह्यातील किनारपट्टीवर कोणत्याही अनुदानाशिवाय पर्यटन व्यावसायिकांनी निवास न्याहारी सुरू केले. पर्यटन व्यावसायिकांना आमदारांनी बळ द्यायला हवे होते मात्र याकडेही त्यांनी दुर्लक्ष केले. मुंबईत असतानाही ते सी-वर्ल्डच्या महत्वाच्या बैठकीस अनुपस्थित राहिले. मात्र येत्या काळात सी-वर्ल्ड प्रकल्प मार्गी लावण्यावर भाजपकडून प्रयत्न केले जातील असेही श्री. मोंडकर यांनी सांगितले.

3

4