हायस्पीड ट्रॉलर्सवर कारवाईसाठी आम. वैभव नाईक थेट समुद्रात…

2

 

तीन हायस्पीड ट्रॉलर्स पकडण्यात यश ; आमदारांच्या धाडसाचे मच्छीमारांकडून कौतुक…

मालवण, ता. १६ : येथील सागरी हद्दीत घुसखोरी करत मासळीची लूट करण्याबरोबरच पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्या तोडल्या जात असल्याने आमदार वैभव नाईक आक्रमक बनले. सायंकाळी ते थेट आपले पदाधिकारी, मत्स्यव्यवसायचे अधिकारी, पोलिस कर्मचाऱ्यांसह समुद्रात कारवाईसाठी रवाना झाले. यात तीन हायस्पीड ट्रॉलर्सवर कारवाई करण्यात यश मिळाले. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. धडक कारवाईसाठी समुद्रात उतरलेल्या आम. नाईक यांचे मच्छीमारांमधून कौतुक होत आहे.
गेले काही दिवस परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स शेकडोंच्या संख्येने जिल्ह्याच्या सागरी हद्दीत घुसून मासळीची लूट करत आहेत. दिवसा तसेच रात्रीच्यावेळी शेकडोंच्या संख्येने घुसखोरी केलेल्या या हायस्पीड ट्रॉलर्सवर कारवाईस मत्स्य व्यवसाय विभाग असमर्थ ठरत आहेत. रात्रीच्यावेळी घुसखोरी केलेल्या हायस्पीड ट्रॉलर्सवर कारवाई करणे मत्स्य व्यवसाय विभागास जोखमीचे ठरत आहे. कारण शेकडोंच्या संख्येने असलेले हायस्पीड ट्रॉलर्स त्यांना घेरू शकतात. या पार्श्‍वभूमीवर काल सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी पारंपरिक मच्छीमारांकडे कारवाईसाठी जाताना सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
हायस्पीडचे अतिक्रमण सुरू असल्याने मालवणात सायंकाळी उशिरा दाखल झालेले आमदार वैभव नाईक हे आक्रमक बनले. कारवाईसाठी ते स्वतः तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबी जोगी, सन्मेश परब, राजू कुर्ले, मत्स्य परवाना अधिकारी प्रतिक महाडवाला, पोलिस कर्मचार्‍यांसह गस्तीनौकेद्वारे येथील बंदरासमोरील समुद्रात कारवाईसाठी रवाना झाले.
गतवर्षीही आमदारांनी थेट समुद्रात जात परराज्यातील ट्रॉलर्सवर मत्स्य व्यवसाय विभागाच्यावतीने मदतीने कारवाई केली होती. सध्या समुद्र खवळलेला असतानाही जीव धोक्यात घालत आमदार, पदाधिकारी, स्थानिक मच्छीमार, मत्स्यव्यवसायचे अधिकारी, पोलिस कर्मचारी कारवाईसाठी समुद्रात गेले आहेत. यात कोणती कारवाई होते याकडे किनारपट्टीवरील मच्छीमारांचे लक्ष लागून राहिले होते. या कारवाईत तीन हायस्पीड ट्रॉलर्स पकडण्यात यश आले होते. हे ट्रॉलर्स पुढील कारवाईसाठी किनाऱ्यावर आणण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. धडक कारवाई मोहिमेमुळे अन्य ट्रोलर्सनी पळ काढला.

20

4